अग्रलेख...
donald trump काही मुठी झाकलेल्या असतात तोवर त्यांच्या शक्तीच्या काल्पनिक भयाने अनेक जण थरकापून राहतात. पण दर्पोक्तीच्या फुत्कारांचे फवारे आदळून मूठ सैल होत गेली की आवळलेल्या मुठीमध्ये काहीच नाही, याची जगाला जाणीव होते आणि दर्पोक्तीचे हसे होते. आपल्या दुसऱ्या सत्ताकाळात, सन 2025 पासून अमेरिकेला सर्वोच्च स्थानावर राखण्याचे सारे श्रेय स्वतःकडे ठेवण्याच्या हट्टापायी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कारकीर्दीत जेव्हा जेव्हा कोलांटउड्या मारल्या, तेव्हा तेव्हा ती झाकली मूठ उघडी होत गेली आणि ट्रम्प यांच्यावरील हेकेखोरीचा शिक्का ठळक होत गेला. ‘अमेरिका फर्स्ट’ या घोषणेमागचा त्यांचा हेतू ‘स्वयंप्रतिमा’ निर्मितीचाच होता आणि आपणच जगाचे तारणहार आहोत अशा थाटात सर्वत्र नाक खुपसण्याच्या त्यांच्या स्वयंघोषित नेतृत्वशैलीमागेही स्वतःची प्रतिमा प्रत्यक्षाहूनही अधिक उजळ दाखविण्याचाच त्यांचा हेतू होता, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. जगात शांतता नांदावी यासाठी आपण अथक परिश्रम घेत असल्याचे भासविण्यामागेही, शांततेचे नोबेल पारितोषिक मिळविणे हाच हेतू असल्याचा अनेकांचा दावा पुढे त्यांच्या प्रत्येक कृतीनंतर सबळ होत गेला आणि ट्रम्प यांची झाकली मूठ उघडी पडत गेली.
गेल्या वर्षभरात ट्रम्प यांनी शांतता करार घडविल्याचे आणि युद्धे थांबविण्याचे अनेक दावे केले, त्यामागेही शांततेचे नोबेल मिळविण्याची त्यांची धडपड होती हे स्पष्ट झाले. आपण सहा ते नऊ युद्धे संपविली आणि शांतता प्रस्थापित केली, अशी दर्पोक्ती करीत जगाच्या कल्याणासाठी आपला जन्म झाला असल्याचा व आपण सर्वशक्तिमान असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या या नेत्याच्या कार्यशैलीमुळे जगाच्या नजरेसमोर असलेली ‘शक्तिमान राष्ट्र’ ही अमेरिकेची प्रतिमा आता संकटात सापडली असून शांतिदूत म्हणून मिरविण्याच्या धडपडीतून ट्रम्प यांच्यावर युद्धखोरीचा ठपका बसण्याच्या शक्यतेमुळे अमेरिकेच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसला आहे. 2025 मध्ये नोबेल पुरस्कार मिळविण्याचे सारे प्रयत्न फोल ठरल्यानंतर 2026 मध्ये तरी या पुरस्काराचे दावेदार ठरावे यासाठी गाझा संघर्षविरामाचे आणि अन्य राजनैतिक यशाचे पाढे स्वमुखाने वाचणाèया ट्रम्प यांच्या कारकीर्दीला इराणविरुद्धच्या युद्धातील अविचारी हिंसाचाराची काजळी लागल्यामुळे जी काही नामुष्की झाली आहे, त्यातून सावरण्यासाठी व झाकली मूठ ताकदवान असल्याची जाणीव जगाला पुन्हा करून देण्यासाठी अमेरिकेला काही दशकांचा भविष्यकाळ कामी लावावा लागणार आहे. हे सारे ट्रम्प यांच्यामुळे घडत असल्याची खंत अमेरिकेतील विचारी जनता, नेते आणि राजनैतिक क्षेत्रात उमटू लागली आहे. केवळ काही दिवसांत इराणची खामेनेई सत्ता उलथून टाकू आणि तेथील जनतेला अपेक्षित असलेली सत्ता प्रस्थापित करून देऊ, अशी दर्पोक्ती करीत तब्बल 40 दिवस इराणच्या विध्वंसाकरिता इरेस पेटून सारी ताकद पणाला लावलेल्या ट्रम्प यांच्या हेकेखोरीमुळे उद्भवलेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे अवघ्या जगाने भविष्यभयाने आपला श्वास रोखून धरला होता. इराणची संपूर्ण संस्कृती इतिहासजमा करून इराणला पुन्हा अश्मयुगात धाडण्याचा अविवेकी इशारा देत आपल्या युद्धपिपासेचे विकृत दर्शन घडविणाऱ्या दर्पोक्तीच्या अंमलबजावणीच्या अखेरच्या क्षणी मात्र अचानक माघार घेत शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचे श्रेय स्वतःच्या नावे जमा करण्याचा ट्रम्प यांचा नवा प्रयत्न म्हणूनच युद्धबंदीच्या या हतबल निर्णयाची नोंद घ्यावी लागेल. इराणची संस्कृती नष्ट करण्याचा इशारा देऊन त्यासाठी दिलेल्या मुदतीचा अंतिम क्षण नजीक येण्याच्या जेमतेम 90 मिनिटे अगोदर ट्रम्प यांनी पाकिस्तानला पुढे करून मांडला गेलेला युद्धबंदी प्रस्ताव मान्य केला आणि हजारोंचे बळी घेणारे हे युद्ध तात्पुरत्या स्वरूपात तरी थांबल्याच्या जाणिवेने जगाने नि:श्वास सोडला. पुढच्या दोन आठवड्यांत होऊ घातलेल्या वाटाघाटी आणि करारादी राजनैतिक औपचारिकतेतून जे काही निष्पन्न होईल, त्यावर या युद्धाचेच नव्हे, तर ट्रम्प यांच्या प्रतिमेचे आणि अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाचेही भवितव्य ठरणार असल्याची धाकधूक मात्र अजूनही संपलेली नाही. कारण युद्धबंदीचा प्रस्ताव उभय बाजूंनी स्वीकारल्यानंतर काही तासांतच पुन्हा इस्रायलने लेबनॉनवर भीषण हल्ला केल्याने मध्यपूर्वेतील युद्धाचे ढग अजूनही कायमच आहेत. बुधवारी इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचे रूप आतापर्यंतच्या संघर्षातील सर्वात भीषण होते. यामध्ये शेकडो निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून इराणने पुन्हा युद्धाचा इशारा जारी केला आहे. त्यामुळे युद्धबंदीचा हा निर्णय टिकणार की केवळ फार्स ठरणार, याकडे लक्ष लागलेल्या जगाचा श्वास पुन्हा एकदा रोखला गेला आहे. अमेरिकेसोबत शांतता करार करण्याबाबत वाटाघाटी होणार किंवा नाही, यावरच विचार करण्याची वेळ आल्याचा इशारा या हल्ल्यानंतर इराणने दिल्यानंतर, अमेरिका मात्र वाटाघाटींसाठी आग्रही असल्याचे जे चित्र रंगविले जात आहे, ते पाहता, अमेरिकेस या युद्धस्थितीतून बाहेर पडणे आता अपरिहार्य असल्याचेही स्पष्ट होऊ लागले आहे.
या अपरिहार्यतेची अनेक कारणे आहेत. पहिले म्हणजे, खामेनेई या इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर अमेरिकेस अपेक्षित सत्तापालट घडवून आणणे शक्य झालेले नाहीच; उलट या हत्येमुळे इराणची प्रतिशोधाची ऊर्मी अधिक उफाळल्याने अमेरिकेच्या प्रत्येक हल्ल्यास जोरदार प्रत्युत्तर देत इराणने अमेरिकेस जेरीस आणले. इराणला चुटकीसरशी निपटून टाकण्याचा अमेरिकेचा दावा फोल ठरवत या शक्तिमान म्हणून मिरविणाèया राष्ट्राची जागा दाखवून दिली. ट्रम्प यांच्या दर्पोक्तीपुढे गुडघे न टेकता प्रत्येक आव्हानाचे उत्तर देण्याचा इराणचा निर्धार अखेरच्या क्षणापर्यंत अमेरिकी सैन्याचे मनोबल खच्ची करत होता आणि लक्षावधी डॉलर्सच्या युद्धसामग्रीचा पुरता विध्वंस झाल्याने अमेरिकेची युद्धक्षमताही खिळखिळी झाली होती. अमेरिका जेवढा काळ मैदानात असेल, तेवढ्या काळापर्यंत चिवट लढा देण्याचा इरादा वारंवार स्पष्ट करून इराणने अमेरिकेसमोर न झुकण्याचा घेतलेला पवित्रा हा अमेरिकेच्या सहज विजयाच्या स्वप्नरंजनास जबर धक्का देणारा ठरल्याने तेथील नागरिकांमध्येही ट्रम्प यांच्या हेकेखोर युद्धखोरीविषयी नाराजीचे स्पष्ट संगरूर उमटू लागले होते. इस्रायलचे बोट धरून ट्रम्प यांनी अमेरिकेस युद्धाच्या खाईत ढकलल्याची जाणीव व्यक्त होऊ लागल्यावर ट्रम्प यांच्या प्रतिमानिर्मितीच्या स्वघोषित प्रयत्नांना उतरती कळा लागल्याचे स्पष्ट झाले. अशा वेळी पाकिस्तानच्या हतबलतेचा फायदा घेण्याचा शहाणपणा ट्रम्प प्रशासनाने वेळीच दाखविला आहे. युद्धबंदीसाठी व संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान पुढाकार घेत असल्याचे चित्र जगासमोर आणले गेले आणि अमेरिकेचाच युद्धबंदीचा अप्रत्यक्ष प्रस्ताव पाकिस्तानमार्फत मांडला गेला.
शस्त्रसंधीच्या या पाकिस्तानी प्रस्तावावर बुधवारी इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात मतैक्य झाले असले, तरी हा शस्त्रसंधी दोन आठवडे टिकेल, याची खात्री नाही. या मतैक्यानंतर लगेचच इस्रायलने लेबनॉनला प्रस्तावाच्या कक्षेतून वगळण्याचा पवित्रा घेत केलेल्या हल्ल्यांमुळे युद्धाचे वातावरण पुन्हा चिघळले आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानला पुढे करण्याच्या प्रयत्नांवरही पाणी पडले.donald trump येत्या शनिवारपासून या प्रस्तावावर पाकिस्तानात अमेरिका-इराण यांच्यात चर्चा होणार असली, तरी इस्रायलचे हल्ले आणि इराणचे प्रतिहल्ले यांच्यामुळे या शस्त्रसंधीचे गांभीर्य हरवले आहे. इराणी संस्कृती इतिहासजमा करण्याच्या धमकीनंतर इराणवर आणि जगावर विध्वंसाच्या भीतीचे सावट गडद झाले होते, पण इराणचा बाणा आणि अमेरिकेतील जनमानसाचा कल यामुळे ट्रम्प यांना माघारीचा पर्याय निवडण्यासाठी हा प्रस्ताव उपयुक्त ठरला, एवढेच या प्रस्तावाचे नेमकेपण म्हणावे लागेल. लेबनॉनमधील धुमश्चक्रीनंतर पुन्हा एकदा होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी झाली आहे. या सामुद्रधुनीवरील इराणचे वर्चस्व मोडून काढणे व इराणमध्ये सत्तापालट घडवून आणणे ट्रम्प यांच्या हेकेखोर प्रशासनास शक्य झालेले नाही. मग 40 दिवस विध्वंसक युद्ध करून, जगाला आर्थिक संकटात ढकलून आणि भावी पिढ्यांच्या भविष्यावर काजळी फेरणारी कारवाई करून ट्रम्प यांनी काय मिळविले, हा प्रश्न आता त्यांना जगभरातून विचारला जाणार आहे. या युद्धात सर्वाधिक होरपळ झालेल्या पाकिस्तानला सावरण्यासाठी त्यांच्या शांतिदूत भूमिकेचा काय फायदा होतो, हेदेखील या अशांत वातावरणाच्या अनिश्चिततेतून उघड होणार आहे. युरोपीय देशांनी या युद्धाकडे तटस्थतेने पाहिले. अशी भूमिका अंतिमतः राजनैतिकदृष्ट्या योग्य ठरली, हे येत्या दोन आठवड्यांतील घडामोडींनंतर जेव्हा जगाला पटेल, तेव्हा ट्रम्प यांच्या प्रतिमेचे भविष्य काय असेल, याचे उत्तरही सापडलेले असेल.