पुणे
Pune Zilla Parishad international school ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून जिल्हा परिषदेची पहिली इंग्रजी माध्यमाची ‘आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा’ सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा मिळणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातून मत व्यक्त केले जात आहे.
पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे उभारण्यात आलेली ही शाळा ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळा’ या नावाने ओळखली जाणार असून ती सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजी माध्यमातील आधुनिक शाळा आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मस्थळाजवळ सुरू झालेल्या या शाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
या शाळेच्या माध्यमातून Pune Zilla Parishad international school आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, डिजिटल सुविधा, विज्ञान व संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय तसेच क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना मोफत भोजन, गणवेश आणि वाहतूक सुविधा देखील पुरवण्यात येणार आहेत.सध्या पहिल्या टप्प्यात प्री-प्रायमरी ते इयत्ता दुसरीपर्यंत सुमारे 260 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून पुढील टप्प्यात ही क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचे नियोजन आहे. निवड प्रक्रिया घराघर सर्वेक्षण आणि पात्रतेच्या आधारे करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या मते, हा उपक्रम ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला आधुनिक आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रयोग आहे. भविष्यात या शाळेचा विस्तार करून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या उपक्रमाचे शिक्षणतज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांसारख्या संधी मिळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.