सांगली
Sangli black magic विज्ञान आणि प्रगतीचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेची मुळे अजूनही घट्ट रोवलेली असल्याचे धक्कादायक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शेणे येथील स्मशानभूमीत मध्यरात्रीच्या सुमारास अघोरी कृत्ये केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती समोर आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. सकाळच्या वेळी काही नागरिक स्मशानभूमीत गेले असता त्यांना संशयास्पद साहित्य विखुरलेल्या अवस्थेत आढळले. यात काळे कापड, टाचण्या टोचलेली काळी बाहुली, लिंबू, सुया, कोहळे आणि नारळ यांसारख्या वस्तूंचा समावेश होता. या वस्तूंमुळे जादूटोणा किंवा करणीसारखा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांत वाळवा तालुक्यात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा असून, यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावली आहे. काही ग्रामस्थांनी या घटनांमुळे भीती व्यक्त केली असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, अंधश्रद्धा Sangli black magic निर्मूलन चळवळीशी संबंधित कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, अशा अघोरी कृत्यांमुळे कोणाचेही भले किंवा वाईट होत नाही. हे केवळ अज्ञानाचा फायदा घेत लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार आहेत. त्यांनी प्रशासनाला अशा भोंदूगिरीवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणात नेमका कोण व्यक्ती किंवा गट सहभागी आहे, तसेच कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार घडला, याबाबत गावात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून, संबंधितांना शोधून काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.नाशिकमधील भोंदूगिरीच्या प्रकरणानंतर आता सांगलीतील हा प्रकार समोर आल्याने राज्यात अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याची गरज अधोरेखित होत असून, Sangli black magic नागरिकांनी अशा भोंदूगिरीपासून सावध राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.