सोलापूर
Solapur fake HIV report case सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला असून, खोट्या एचआयव्ही अहवालामुळे एका महिलेचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणांतील कथित हलगर्जी आणि गैरव्यवहारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संबंधित प्रकरणात एका (आयसीटीसी) एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्राने एका गर्भवती महिलेला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, हा अहवाल सरकारी अनुदान मिळवण्यासाठी बनावट पद्धतीने तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पीडित महिला सात महिन्यांची गर्भवती असताना तिला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तिच्या पतीचे आणि पोटातील बाळाचे तपासणी अहवाल अनेक वेळा निगेटिव्ह आले. त्यानंतर महिलेने इतर खाजगी प्रयोगशाळांमध्येही तपासणी केली असता सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याचे समोर आले. या विरोधाभासी अहवालांमुळे संशय अधिक गडद झाला आहे.या प्रकारामुळे महिलेच्या कौटुंबिक आयुष्यावर गंभीर परिणाम झाला असून, सासरच्या मंडळींनी तिला घरातून बाहेर काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पीडित महिला सध्या सामाजिक आणि कौटुंबिक आधारापासून वंचित असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात संबंधित Solapur fake HIV report case आयसीटीसी केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चुकीचा अहवाल दिल्याचा आरोप होत असून, याबाबत चौकशीची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनीही या घटनेची दखल घेत चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.दरम्यान, या घटनेविरोधात कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकारामुळे आरोग्य तपासणी यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, संपूर्ण राज्यात या घटनेची चर्चा सुरू आहे.