जागतिक मंदीतही टीसीएसची चांदी!

सर्व कर्मचाऱ्यांना दिली वार्षिक पगारवाढ

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
TCS gave salary hike जागतिक आर्थिक अनिश्चितता, तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांमध्ये पगारवाढीबाबत अनिश्चितता निर्माण झाली असताना देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा जाहीर केला आहे. कंपनीने सर्व स्तरांतील कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला असून ही वाढ एक एप्रिल २०२६ पासून लागू करण्यात आली आहे.
 

TCS give salary hike 
 
 
उत्तम काम करणाऱ्यांना अधिक प्रोत्साहन
गेल्या वर्षी मूल्यमापन प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यामुळे यंदा कंपनीने ही प्रक्रिया लवकर पूर्ण केली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यामुळे कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारात वाढीचा लाभ मिळणार असून कोणताही कर्मचारी वगळला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनीने पगारवाढीचा निश्चित टक्केवारीचा आकडा जाहीर केला नसला तरी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुलनेने मोठी वाढ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांना दहा टक्क्यांपेक्षा अधिक वाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कामगिरीवर आधारित ही रचना असल्यामुळे उत्तम काम करणाऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळणार आहे.
 
 
 
नवीन कर्मचाऱ्यांची भरतीही सुरु
सध्या जागतिक स्तरावर आयटी क्षेत्रात दबावाचे वातावरण असतानाही टीसीएसने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नोकरी कपातीच्या चर्चा सुरू असताना कंपनीने पगारवाढ जाहीर करून आपल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्याचा विश्वास दिला आहे. टीसीएसमध्ये सुमारे पाच लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत असून यातील मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना या वाढीचा लाभ मिळणार आहे. यावर्षी कंपनीने काही हजार नवीन कर्मचाऱ्यांची भरतीही केली आहे.
 
 
 
कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कामकाजावर भर
कंपनीने भविष्यातील तंत्रज्ञान बदल लक्षात घेऊन कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कामकाजावर भर दिला आहे. कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली असून बहुतांश कर्मचाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती विश्लेषण, क्लाउड सेवा, सायबर सुरक्षा आणि डिजिटल प्रणाली यांसारख्या क्षेत्रांमध्ये कौशल्य विकसित केले आहे.या धोरणामुळे कंपनीचे कामकाज अधिक आधुनिक आणि स्पर्धात्मक होत असून आगामी काळात कंपनीची वाढ अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. पगारवाढीचा निर्णय आणि तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून संपूर्ण आयटी क्षेत्राला यामुळे सकारात्मक संदेश मिळाला आहे.