अनिल कांबळे
नागपूर ,
tenants minor son beaten किरकाेळ कारणावरून घरमालकाने भाडेकरुनच्या अल्पवयीन मुलाला निर्दयीपणे मारहाण केली. त्यामुळे भीतीपाेटी मुलाने घरातून पळ काढला. काही तास कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागल्यानंतर ताे पाटणकर चाैकातील बालसुधारगृहात आढळून आल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला. गिट्टीखदान पाेलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना गडली. आकाश ठाकूर (32, सुरेंद्रगड) असे आराेपीचे नाव आहे.
7 एप्रिल राेजी त्याने भाडेकरूच्या अल्पवयीन मुलाला केवळ लहानशी लाेखंडी सळई घेतली म्हणून बेदम मारहाण केली. मुलाच्या किंकाळ्या ऐकून त्याचे पालक बाहेर आले. तेव्हा आकाश त्याला मारताना दिसला. त्याच्या वडिलांनी अडविले व कारण विचारले. आराेपीने वडिलांनादेखील शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे घाबरलेला मुलगा पूर्णपणे हादरला हाेता. त्याच्या मनात भीतीचे सावट इतके पसरले की, काही वेळातच ताे घरातून कुणालाही न सांगता निघून गेला. त्याच्या कुटुंबियांनी सगळीकडे त्याचा शाेध घेतला. मात्र ताे कुठेच न आढळल्याने अखेर बुधवारी पाेलिसांत तक्रार केली. तेव्हा मुलगा पाटणकर चाैकातील बालसुधारगृहाच्या कार्यालयात असल्याची माहिती मिळाली. त्याच्या वडिलांनी त्याला तेथे जाऊन ताब्यात घेतले. त्यांच्या तक्रारीवरून आकाश ठाकूरविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.