मोठ्यांपेक्षा नवखे सरस; आयपीएलमध्ये तरुणांची छाप

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
The impact of youth in IPL यंदाच्या आयपीएल हंगामात रंगतदार सामने पाहायला मिळत असताना अनुभवी खेळाडूंसोबतच नवोदित क्रिकेटपटूंची कामगिरी विशेष ठरत आहे. संघांना मोठ्या नावांवर अवलंबून राहावे लागत नाही, हे या तरुण खेळाडूंनी सिद्ध केले आहे. समीर रिझवी, अंगकृष रघुवंशी, वैभव सूर्यवंशी आणि मुकुल चौधरी या नवख्या खेळाडूंनी आपल्या दमदार खेळामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.राजस्थानच्या यशस्वी जैस्वालने धावांच्या शर्यतीत आघाडी घेतली असून त्याने तीन सामन्यांत १७० धावा करत आपली छाप पाडली आहे. त्याच्या मागोमाग समीर रिझवीनेही तितकीच प्रभावी फलंदाजी करत तीन सामन्यांत १६० धावा जमवल्या आहेत. कोलकात्याच्या अंगकृष रघुवंशीने संघाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी त्याची वैयक्तिक कामगिरी ठळक ठरली आहे. त्याने चार सामन्यांत १५५ धावा करत सातत्य राखले आहे.
 
 
 
The impact of youth in IPL
 
वैभव सूर्यवंशी थोडा मागे असला तरी त्याने आपल्या आक्रमक खेळशैलीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याने तीन सामन्यांत १२२ धावा करत चौकार-षटकारांची आतषबाजी केली आहे. दरम्यान, मुकुल चौधरीने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अपेक्षित कामगिरी केली नव्हती, मात्र त्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन करत कोलकात्याविरुद्ध नाबाद ५४ धावांची खेळी साकारली आणि आपल्या संघाला महत्त्वाचा विजय मिळवून दिला. विशेष बाब म्हणजे हे सर्व खेळाडू अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले नाहीत. कमी मोबदल्यात संघात घेतलेल्या या तरुणांनी मात्र मोठ्या खेळाडूंनाही मागे टाकत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. मोठी रक्कम मिळूनही काही नामांकित खेळाडूंना प्रभावी खेळी करता आलेली नसताना या नवोदितांनी संधीचे सोने केले आहे. जर या तरुणांची अशीच सातत्यपूर्ण कामगिरी सुरू राहिली, तर त्यांना लवकरच राष्ट्रीय संघात स्थान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी सामन्यांमध्ये हे नवोदित खेळाडू आपली छाप कितपत टिकवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.