अल्लुरी सीताराम राजू,
Three young women drown to death आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील मूलगुम्मी परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. धबधब्याजवळ सेल्फी काढताना घडलेल्या अपघातात तीन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका गावातील चार मुली सुट्टीच्या काळात धबधबा पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ काढताना अचानक ही दुर्घटना घडली. पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने आणि पोहता येत नसल्यामुळे तिघी मुली पाण्यात ओढल्या गेल्या आणि काही क्षणांतच त्या प्रवाहात वाहून गेल्या.

या घटनेत त्रिशा, पवित्रा आणि रत्नकुमारी या तीन मुलींचा मृत्यू झाला असून जखमी झालेल्या अंजली हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा जोर इतका अधिक होता की त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. अपघातानंतर शोधमोहीम राबवण्यात आली आणि काही वेळातच तिघींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून प्राथमिक माहितीनुसार सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.