मोठी कारवाई; ४५१ सिलिंडर आणि ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
मुंबई,
cylinders-valuables-seized : मुंबईतील दक्षिण भागातील वाडीबंदर परिसरात अवैध गॅस साठवणूक आणि वाहतुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून शिधावाटप यंत्रणेने धडक कारवाई करत हा प्रकार उघड केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ४५१ गॅस सिलिंडर, ८ वाहने आणि सुमारे ४० लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 

MUMBAI  
 
 
अधिकाऱ्यांना वाडीबंदर ब्रिज आणि डोंगरी परिसरात घरगुती तसेच व्यावसायिक सिलिंडरची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तातडीने सापळा रचून तपास मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान गॅस सिलिंडरने भरलेल्या ८ गाड्या थांबवून तपासणी करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात अवैध साठा आढळून आला.
 
ही संपूर्ण कारवाई शिधावाटप व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. घटनास्थळी उपस्थित पथकाने सखोल तपास करून सर्व वाहने आणि सिलिंडर जप्त केले असून पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकरणात संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या गरजेच्या वस्तूंचा काळाबाजार किंवा अवैध साठवणूक करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहील.