तालुक्यातील कुंभारकिन्ही पुनर्वसन येथील Yogiraj Shinde योगीराज भारत शिंदे (वय 28) याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलिस भरतीत चौथ्या प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे. तीन वेळा अपयशाचा सामना करूनही हार न मानता जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर त्याची चंद्रपूर बँड्समन पदासाठी आणि यवतमाळसुद्धा येथे याच पदासाठी जिल्हा टॉपर होण्याचा मान त्याने मिळवला आहे.
योगीराजचे वडील शहरातील एका शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होते. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तिघा भावांमध्ये सर्वात मोठा असलेल्या योगीराजवर जबाबदारी होती. शिक्षणासाठी त्याने तब्बल अडीच वर्षे पेट्रोलपंपावर रात्रीची नोकरी करून शिक्षण पूर्ण केले. रात्री वाहनांची वर्दळ कमी होताच तो शांततेत अभ्यास करायचा. शालेय जीवनातच योगीराजने आपली क्रीडा क्षमता सिद्ध केली होती. तो जिल्हास्तर मॅरेथॉन स्पर्धेत विजेता ठरला होता. मात्र आर्थिक अडचणींमुळे त्याला त्या क्षेत्रात पुढे जाता आले नाही.
Yogiraj Shinde दरम्यान, त्याचे काही मित्र पोलिस दलात भरती झाले. पेट्रोलपंपावर काम करताना मित्रांकडून झालेल्या हेटाळणीनेच त्याच्या मनात पोलिस बनण्याची जिद्द निर्माण झाली व यानंतर योगीराजने दररोज 13 ते 14 तास अभ्यास व सुमारे 3 तास मैदानी सराव करण्याची शिस्त लावली. नागपूर, लातूर, चंद्रपूर येथे भरतीत तीन वेळा अपयश आले. मात्र, चौथ्या प्रयत्नात योगीराजने चक्क दोन जागी यश मिळवले. मैदानी चाचणीत 42 गुण तर लेखी परीक्षेत 90 गुण मिळवत एकूण 132 गुणांची कमाई करीत त्याची चंद्रपूर येथेसुद्धा निवड झाली. भरतीच्या आठ महिन्यांपूर्वी त्याने पेट्रोल पंपावरील नोकरी सोडून पूर्णवेळ अभ्यास व सरावावर लक्ष केंद्रित केले. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही आईला मिळणाèया ‘लाडकी बहीण’ मदतीतून त्यांनी आपल्या आहार व अभ्यास साहित्याचा खर्च त्याने भागवला. या प्रवासात संकल्प करिअर अकॅडमीचे मार्गदर्शन योगीराज शिंदेला लाभले. निवड झाल्यानंतर मित्रांनी गुलाल उधळून योगीराज व शिंदे कुटुंबियांचा आनंद साजरा केला.