तरुणांना स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शनासाठी ‘युवा संवाद’

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
आयएएस, आयपीएस अधिकारी करणार मार्गदर्शन
जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

यवतमाळ, 
'Yuva Samvad' यवतमाळ जिल्ह्यातील तरुण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन व शासनाच्या विविध संधीची माहिती देणारा उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने मंगळवार, 21 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यानंतर दर सोमवारी बचत भवन येथे ‘युवा संवाद’ हा विशेष मार्गदर्शन कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पत्रपरिषदेत दिली. या पत्रपरिषदेत निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रथमच आयोजित केलेला आहे. यात विद्यार्थ्यांशी भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा व भारतीय वन सेवेतील अधिकारी व अन्य तज्ञ अधिकारी संवाद साधणार आहेत.
 
 
tarkun
 
हा युवा संवाद दर सोमवारी होणार असला तरी पहिले सत्र मंगळवार, 21 एप्रिल रोजी ‘पोलिस सेवा संधी, आव्हाने व मानसिक तयारी’ या विषयावर भापोसे अधिकारी रॉबिन बन्सल मार्गदर्शन करणार आहेत. सोमवार, 27 एप्रिल रोजी ‘यशोगाथा प्रेरणा आणि अनुभव सामायिकरण’ या विषयावर यूपीएससी उत्तीर्ण कृष्णा पिसाटे, 4 मे रोजी ‘यूपीएससी व स्पर्धा परीक्षा तयारी’ यावर भाप्रसे अधिकारी, 11 मे रोजी ‘भारतीय वन सेवा तयारी कशी करावी आणि आवश्यक कौशल्ये’ या विषयावर भावसे अधिकारी, 18 मे रोजी ‘एमपीएससी परीक्षांच्या संधी आणि तयारी’ या विषयावर उपजिल्हाधिकारी गंगाधर ओवाळे, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, 25 मे रोजी ‘करिअरच्या विविध संधी’ या विषयावर नालंदा अकादमीचे अनूपकुमार, तर 1 जून रोजी ‘शासन फेलोशिप : पात्रता, तयारी व संधी’बाबत विठ्ठल गाडगे, प्रसाद कुळकर्णी व कुणाल पाटील यांचे मार्गदर्शन होणार आहे.
 
 
 
Yuva Samvad'  प्रत्येक सत्र सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत चालणार आहे. पहिल्या तासात अनुभवी वक्त्यांंचे मार्गदर्शन, दुसèया तासात उपस्थित विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तरांचे सत्र आयोजित केले जाईल, ज्यामध्ये शंका निरसनावर विशेष भर दिला जाणार आहे. या उपक्रमासाठी एकूण 800 पासेसची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी पूर्वनोंदणी करणे अनिवार्य आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. याशिवाय, प्रशासन व विद्यार्थी यांच्यातील दरी कमी करून थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना व्यावहारिक रणनीती, रोडमॅप व अभ्यासाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन, करिअरच्या विविध संधींबाबतही माहिती मिळणार आहे. फेलोशिप व उद्योजकता यासारख्या पर्यायांवरही प्रकाश टाकण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी दिली.