नागपूर,
हायझेरो कंपनीने विकसित केलेले Hydrogen-powered vehicle हायड्रोजनवर चालणारे अत्याधुनिक त्रिचक्री वाहन एलआयटी विद्यापीठाच्या परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात लोकार्पित करण्यात आले. या वाहनाची प्रायोगिक धाव विद्यापीठातील लोकसारंग हरदास इन्क्युबेशन सेंटर ते मुख्य हेरिटेज इमारत या मार्गावर घेण्यात आली. या कार्यक्रमास एलआयटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, हायझेरो एनर्जी इकोसिस्टमचे समीर बेंद्रे तसेच एलआयटीचे वरिष्ठ माजी विद्यार्थी व प्रसिद्ध उद्योजक कमल सीथा उपस्थित होते. कमल सीथा यांच्या हस्ते या वाहनाचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले.
डॉ. वैद्य म्हणाले, Hydrogen-powered vehicle हायड्रोजनचलित वाहन हे एलआयटी विद्यापीठाच्या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाला चालना देण्याच्या ध्येयातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे नागपूरला हायड्रोजन ऊर्जा संशोधन व विकासाचे केंद्र म्हणून नवे स्थान प्राप्त होईल. ब्रिलच्या संचालिका डॉ. प्रतिभा अग्रवाल म्हणाल्या की, हा उपक्रम पुढील पिढीसाठी हरित तंत्रज्ञानाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारा ठरेल.
याप्रसंगी डॉ. सीथा यांनी हायझेरोच्या अत्याधुनिक फ्युएल सेल तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे वाहन शून्य उत्सर्जन, अधिक अंतर क्षमता आणि जलद इंधन भरण्याची सुविधा या वैशिष्ट्यांमुळे शहरी लॉजिस्टिक्स व व्यावसायिक वापरासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. या अभिनव उपक्रमासाठी एलआयटी विद्यापीठाने समीर बेंद्रे, अभिजित देशमुख, अक्षय राजे तसेच संपूर्ण हायझेरो टीमचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. नीरज खटी, वित्त अधिकारी डॉ. शिल्पा पांडे तसेच एलआयटीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.