विमानात 'त्या' १६८ मृत मुलांचे फोटो, दप्तर आणि बूट!

शहीद मुलांच्या स्मृतींसह इराण पोहचला पाकिस्तानात

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
इस्लामाबाद,
168 dead children in Minab पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होणाऱ्या इराण-अमेरिका शांतता चर्चेपूर्वी इराणने एक वेगळी आणि लक्षवेधी भूमिका मांडत जगाचे लक्ष वेधले आहे. चर्चेत सहभागी होण्यासाठी दाखल होताना इराणी प्रतिनिधीमंडळाने आपल्या प्रवासालाच एक प्रतीकात्मक रूप देत मिनाब भागातील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला. मिनाबमध्ये ठार झालेल्या १६८ शाळकरी मुलांचे फोटो, त्यांच्या रक्ताने माखलेल्या दप्तरे आणि बुटांनी विमानातील जागा रिकाम्या ठेवत गालिबाफ यांनी 'एक्स'वर त्याला "या प्रवासातील माझे सोबती" (#Minab168) असे कॅप्शन दिले.
 
 
 
airplane in Minab
या माध्यमातून इराणने अलीकडील हल्ल्यातील निष्पाप बळींचा मुद्दा जागतिक पातळीवर ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न केला. तेहरानने या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे. मिनाबमध्ये झालेल्या या भीषण घटनेत मोठ्या संख्येने शाळकरी मुले मृत्युमुखी पडली होती. या पार्श्वभूमीवर गालिबाफ यांनी आपल्या संदेशातून हे स्पष्ट केले की, इराण चर्चेच्या टेबलावर केवळ राजकीय भूमिका घेऊन नव्हे, तर आपल्या नागरिकांच्या वेदनांसह सहभागी होत आहे. त्यांनी या प्रवासातील या प्रतीकात्मक वस्तूंना आपले सहप्रवासी असल्याचेही नमूद केले.
 
 
या कृतीमुळे शांतता चर्चेपूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. इराणने या माध्यमातून हल्ल्यातील बळींना न्याय मिळावा आणि त्यांचा विसर पडू नये, हा संदेश दिला आहे. त्याचबरोबर, चर्चेत आपली भूमिका ठाम राहणार असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे. दरम्यान, अमेरिकेचे प्रतिनिधीमंडळ जे. डी. व्हान्स यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानात दाखल झाले आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील तणाव कायम असून, विशेषतः लेबनॉन सीमेवरील संघर्षामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.इराणने चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी काही अटी स्पष्ट केल्या आहेत. त्यामध्ये लेबनॉनमधील कारवाया थांबवणे आणि इराणी मालमत्तेवरील निर्बंध हटवणे या मुद्द्यांचा समावेश आहे. या अटी पूर्ण झाल्यानंतरच पुढील चर्चेला गती मिळेल, अशी भूमिका इराणने घेतली आहे. या सर्व घडामोडींमुळे इस्लामाबादमधील चर्चा आणि त्यातून होणाऱ्या निर्णयांकडे जगाचे लक्ष लागले आहे.