अवकाश जिंकून परतले अंतराळवीर; आर्टेमिस २ ठरली ऐतिहासिक

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Astronauts return from conquering space नासाच्या आर्टेमिस २ या महत्त्वाकांक्षी मोहिमेने यशाची नवी उंची गाठली असून चारही अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले आहेत. शनिवारी सकाळी हे अंतराळयान सॅन दिएगो किनाऱ्याजवळ समुद्रात उतरले. सुमारे दहा दिवस चाललेल्या या मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी तब्बल सहा लाख नव्वद हजार मैलांहून अधिक अंतर पार केले. या यशस्वी उड्डाणानंतर आता पुढील आर्टेमिस ३ मोहिमेची तयारी सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रत्यक्ष चंद्रावर पाऊल ठेवण्याचा उद्देश आहे. या मोहिमेत अंतराळवीरांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याऐवजी त्याच्या अत्यंत जवळून प्रवास केला. त्यांच्या परतीनंतर नासाने अंतराळयानाच्या अवतरणाचा व्हिडिओ प्रसिद्ध करत या मोहिमेतील सदस्यांचे स्वागत केले. रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच आणि जेरेमी हॅन्सन या चार जणांनी ही ऐतिहासिक मोहीम पूर्ण केली. विशेष म्हणजे या चमूमध्ये महिला, कृष्णवर्णीय अंतराळवीर आणि परदेशी सदस्याचा समावेश असल्यामुळे ही मोहीम विविधतेचेही प्रतीक ठरली आहे.
 
 
 
 
conquering space 
 
 
 
मूळ नियोजनानुसार ही मोहीम फेब्रुवारी महिन्यात होणार होती; मात्र इंधन गळतीसह काही तांत्रिक अडचणींमुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर आवश्यक दुरुस्त्या पूर्ण करून रॉकेट पुन्हा प्रक्षेपणासाठी सज्ज करण्यात आले. अखेर योग्य वेळ साधून या मोहिमेला यशस्वी सुरुवात देण्यात आली. ही मोहीम पन्नास वर्षांनंतरची पहिली मानवी चंद्राभोवतीची मोहीम ठरली आहे. यापूर्वी अपोलो कार्यक्रमांतर्गत १९६८ ते १९७२ दरम्यान मानवाने चंद्रावर प्रवास केला होता. त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर पुन्हा चंद्राच्या दिशेने उड्डाण झाले नव्हते. त्यामुळे आर्टेमिस २ हे अंतराळ संशोधनातील नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे. फ्लोरिडातील केनेडी अंतराळ केंद्रातून उड्डाण घेतलेल्या या उंच रॉकेटने तीन अमेरिकन आणि एका कॅनेडियन अंतराळवीरांना घेऊन अवकाशात झेप घेतली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो लोकांनी उपस्थिती लावली होती. रस्ते आणि समुद्रकिनारेही लोकांच्या गर्दीने फुलून गेले होते, ज्यामुळे अपोलो मोहिमांची आठवण पुन्हा ताजी झाली. या प्रवासात अंतराळवीरांनी सुरुवातीचे काही तास पृथ्वीच्या कक्षेत घालवत अंतराळयानाची तपासणी केली. त्यानंतर मुख्य इंजिन सुरू करून त्यांनी चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण केले.
 
 
 
 
 
चंद्राजवळ पोहोचल्यावर त्यांनी सुमारे सहा हजार चारशे किलोमीटर अंतरावरून त्याचा अभ्यास केला आणि नंतर दिशा बदलून पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला. हा प्रवास मानवाने केलेल्या सर्वात लांब अंतरांपैकी एक मानला जात आहे. याआधीच्या आर्टेमिस १ मोहिमेत अंतराळयान मानवरहित होते. मात्र या वेळी प्रथमच जीवनावश्यक सुविधा आणि सुरक्षा प्रणालींसह अंतराळवीरांना पाठवण्यात आले होते, ज्यामुळे मोहिमेची जोखीम वाढली होती. तरीही सर्व अडचणींवर मात करत ही मोहीम यशस्वी ठरली. आता या यशाच्या बळावर नासा पुढील काही वर्षांत चंद्रावर मानवाचे पुन्हा पाऊल ठेवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. चंद्रावर दीर्घकालीन वास्तव्य निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने ही मोहीम एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.