कारंजा लाड,
burglary शहरातील गुरुदेव आश्रम परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ९५ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कारंजा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन संजयराव भोंगाडे (वय २९) रा. लक्ष्मी नगर, गुरुदेव आश्रमजवळ, कारंजा यांनी तक्रार दिली.
८ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ३.३० या वेळेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घरात प्रवेश केला. यानंतर घरातील कपाट फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व नाणी चोरून नेण्यात आली. चोरी गेलेल्या मालामध्ये १२ ग्रॅम सोन्याची पोत, दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या कानातील फुलांची जोडी, सोन्याचा शिक्का तसेच पाच चांदीची नाणी यांचा समावेश आहे. चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत ९५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुला, सहायक पोलिस निरीक्षक पवार, पोलिस उपनिरीक्षक पात्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अल्लापूरकर करीत आहेत.