जनगणनेचे काम अचूक, पारदर्शक व गांभीर्याने करा,
जनगणनेत अचूक माहिती द्या : जिल्हाधिकारी विकास मीना
यवतमाळ,
Census Training आगामी जनगणना 2027 ही व्यापक व यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेत 6 ते 11 एप्रिल दरम्यान फिल्ड ट्रेनर यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार विद्या शिंदे, जनगणना संचालनालयाचे मास्टर ट्रेनर सहाय्यक संचालक प्रवीण भगत, सांख्यिकी अन्वेषक विशाल दिवेकर, जिल्ह्याचे मास्टर ट्रेनर तहसीलदार राहुल मोरे, एकनाथ बिजवे तसेच जिल्हा समन्वयक जतीन माहेश्वरी उपस्थित होते. याशिवाय अधिकारी व कर्मचारी फिल्ड ट्रेनर म्हणून सहभागी झाले होते.
प्रशिक्षणादरम्यान जनगणनेच्या प्रत्येक टप्प्यावर संबंधित अधिकारी व फिल्ड ट्रेनर यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली. घर, यादी व घरगणना प्रभावीपणे राबविण्यासाठी वापरण्यात येणाèया मोबाईल अॅपचा वापर, नागरिकांकडून माहिती संकलन करताना विचारायच्या प्रश्नांची योग्य हाताळणी, तसेच संकलित माहिती अचूकपणे मोबाईल अॅपवर अपलोड करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
Census Training यावेळी माहितीची अचूकता, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, माहितीची गोपनीयता आणि निर्धारित वेळापत्रकानुसार कामकाज यावर विशेष भर देण्यात आला. तसेच मोबाईल अॅपमध्ये येणाèया संभाव्य अडचणींवर उपाययोजना करण्याबाबत मास्टर ट्रेनर्सनी सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने जनगणनेचे काम अचूक, पारदर्शक व गांभीर्याने करण्याच्या जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सूचना दिल्या. शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जनगणनेसाठी अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले.