महाराष्ट्रासह अनेक राज्यांत होणार उष्णतेचा डबल अटॅक!

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Double heat attack in Maharashtra भारतीय हवामान विभागाने देशात पुढील काही दिवसांत तीव्र उष्णतेचा इशारा दिला असून, उत्तर आणि मध्य भारतात तापमान झपाट्याने वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. विशेषतः राजस्थानमध्ये याचा सर्वाधिक परिणाम जाणवेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली परिसर, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांनाही उष्णतेच्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वायव्य भारतात तापमानात तब्बल सहा ते आठ अंशांनी वाढ होऊ शकते, तर पूर्व भागात पाच ते सात अंशांनी आणि मध्य भारतात तीन ते पाच अंशांनी तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार असून उष्णतेची तीव्रता अधिक जाणवेल.
 
 
temperature
 
 
आगामी दिवसांत हवामानात फारसा बदल होणार नसल्याने उष्णतेचा तडाखा कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारतात १६ एप्रिलदरम्यान तापमान हळूहळू वाढत जाईल, तर मध्य आणि पूर्व भारतात १४ एप्रिलपर्यंत वाढ दिसून येईल. त्यानंतर काही दिवस तापमान स्थिर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुजरातमध्येही तापमानात वाढ होईल, त्यानंतर काहीसा स्थैर्य येईल. महाराष्ट्रात १४ एप्रिलपर्यंत उष्णतेत वाढ होण्याची शक्यता असून पुढील दोन दिवस मोठा बदल अपेक्षित नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळणे आणि शक्यतो थंड ठिकाणी राहणे, असे मार्गदर्शन हवामान विभागाने केले आहे.
 
 
दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देशातील शेतीलाही मोठा फटका बसला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दोन लाख एकोणपन्नास हजार हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान झाले असून गव्हाच्या पिकाला सर्वाधिक हानी झाली आहे. प्रभावित भागांचा आढावा घेऊन राज्य सरकारांशी समन्वय साधण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच, काही भागांत पावसाची शक्यता कायम असून जम्मू-काश्मीरमधील पश्चिमेकडील वाऱ्यांची स्थिती आणि इतर भागांतील चक्रीय वाऱ्यांमुळे १५ एप्रिलदरम्यान काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे देशभरात एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे काही भागांत पावसाचे वातावरण अशी दुहेरी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.