समुद्रपूर,
medical college in jam हिंगणघाटचे आ. समीर कुणावार यांच्या प्रयत्नानंतर वर्धा जिल्ह्यात मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम येथे मंजूर करण्यात आले होते. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाया उभारणीसाठी आधी ४०३ कोटी रुपयांचा निधी प्रास्ताविक केला होता. मात्र, आ. कुणावार यांनी अधिक निधीची गरज असल्याची मागणी केली. ८ दिवसापूर्वी झालेल्या हायपॉवर कमिटीच्या बैठकीत ७३ कोटी रुपये निधी वाढवून दिला. त्यामुळे आता ४७६ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाया उभारणीसाठीचे भूमिपूजन होणार आहे.

आता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. आ. कुणावार यांनी सरकारकडून वर्धा जिल्ह्यासाठी मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट मतदारसंघाताच व्हावे याकरिता ताकद लावली होती. त्यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात स्वत:च्या सरकारच्या विरोधात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी विधानभवनाच्या पायर्यांवर बसून आंदोलन केले. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयासाठी आमदारकीचा राजिनामा देण्याची भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. कुणावार यांच्या भावना लक्षात घेऊन अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जिल्हात मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातच होणार अशी घोषणा केली. हिंगणघाट शहरात पाहिजे त्या प्रमाणात जागा उपलब्ध नसल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेचा अडथळा निर्माण झाला. मेडिकल कौन्सिलला जाम येथील कृषी विभागाच्या अखत्यारीत असलेली जागा पसंत पडली.medical college in jamयाठिकाणी बांधकामासाठी ४७६ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. आपल्या मतदार संघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे आपले स्वप्न पूर्ण झाले आहे. आधी येथील कामासाठी ४०७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, याठिकाणी अधिकच्या इमारतीची गरज लक्षात घेऊन आठ दिवसापूर्वी ७३ कोटी रुपये अधिकचा निधी मंजूर झाला. आता ४७६ कोटी रुपयांच्या निधीतून याठिकाणी लवकरच भूमिपूजन होणार आहे. अत्याधुनिक सुसज्ज अशी इमारती उभारण्यात येणार आहे, असे आ. समीर कुणावार यांनी सांगितले.