देवळी,
mineral foundation जिल्हा खनिज प्रतिष्ठानचा निधी हा सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी असून त्याचा पारदर्शक व परिणामकारक वापर झाला पाहिजे, अशा सुचना आ. राजेश बकाने यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा खनिज प्रतिष्ठानंतर्गत नियामक परिषद बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीकांत शेळके, कार्यकारी अभियंता धीरज परांडे आदी उपस्थित होते.
आ. बकाने यांनी विकास कामांना गती देण्यासाठी सक्रिय व ठोस भूमिका मांडली. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या शासन निर्णयांनुसार गठीत करण्यात आलेल्या या परिषदेत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात हाती घेण्यात येणार्या विविध विकासकामांच्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सन २०२५-२६ साठी व्यवस्थापक समितीने केलेल्या निधी नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी आ. राजेश बकाने यांनी खनिज प्रभावित भागांच्या सर्वांगीण विकासासाठी निधीचा प्रभावी वापर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. विशेषतः आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, दर्जेदार रस्ते आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती या बाबींना प्राधान्य देण्याबाबत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळेल अशा योजनांची अंमलबजावणी करण्यावर आ. बकाने यांनी भर दिला.
बैठकीदरम्यान विविध विभागांकडून प्राप्त प्रस्तावांचे परीक्षण करून लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक त्या कामांना प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.mineral foundation या बैठकीमुळे वर्धा जिल्ह्यातील खनिज प्रभावित भागांच्या विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास आ. बकाने यांनी व्यत केला.