- तिरोडा नगर परिषदेच्या पीएमश्री शाळेतील हृदयद्रावक घटना
दिनांक :11-Apr-2026
Total Views |
तिरोडा,
school gate येथील नगर परिषदतर्फे संचलित लोधीटोला येथील पीएमश्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील नादुरूस्त लोखंडी फाटक (गेट) अंगावर कोसळल्याने इयत्ता पाचव्या वर्गातील विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजता सुमारास घडली. निराली मनीष चाफले (११) असे त्या मृत विद्यार्थीनीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचा मुख्य प्रवेशद्वारावरील लोखंडी फाटकेचा लॉक तुटल्यामुळे बर्याच काळापासून नादुरूस्त आहे. त्यात फाटक दुरुस्तीचा प्रस्ताव नगर परिषदेकडे प्रलंबित असल्याची माहिती असून शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांना गेटपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. मात्र, शनिवारी दुपारी सुमारे १ वाजता शाळा सुटल्यावर बाहेर पडताना दुर्दैवाने निरालीने गेट ओढला आणि तो अचानक तिच्या अंगावर कोसळला.school gate या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर तिरोडा येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोंदियाला हलविण्यात आले. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, निरालीच्या आई शुभांगी चौधरी (चाफले) या त्याच शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असून निरालीने राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत राज्यात चौथा क्रमांक पटकावला होता. अलीकडेच पुणे येथे तिचा सन्मानही करण्यात आला होता. मात्र, या दु:खद घटनेमुळे तिरोडा परिसरात शोककळा पसरली आहे.