हिंगणघाट,
umed vardhini mart महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा नियोजन समिती (नावीन्यपूर्ण योजना सन २०२१-२२) तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुत वतीने हिंगणघाटात उमेद वर्धिनी मार्टचे लोकार्पण करण्यात आले. आ. समीर कुणावार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मार्टच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या आर्थिक उन्नतीला मदत होणार आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन आ. समीर कुणावार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पंसचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, तालुका अभियान व्यवस्थापक सचिन सावरकर यांच्यासह नगरसेवक दिनेश वर्मा, शितल मोहता उपस्थित होते.
ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना स्थिर व विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद वर्धिनी मार्ट ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून महिलांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करता येणार असून मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळून वोकल फॉर लोकल या संकल्पनेलाही चालना मिळणार आहे.
यावेळी आ. कुणावार यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविणे, त्यांच्या कौशल्याला योग्य दिशा देणे आणि त्यांना बाजारपेठेशी जोडणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा उपक्रमांना अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक करत ‘उमेद वर्धिनी मार्ट’ हे महिलांसाठी केवळ विक्रीचे केंद्र नसून त्यांचा आत्मविश्वास आणि स्वाभिमानाला नवी उंची देणारे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास व्यत केला.umed vardhini mart हा प्रकल्प हिंगणघाट परिसरातील महिला उद्योजिकांसाठी नवी संधी निर्माण करत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यत होत आहे.