समृद्धी महामार्गावर गोवंशाची अमानुष वाहतूक उघड

१३ जनावरांसह ६.६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
कारंजा लाड,
transportation of cattle समृद्धी महामार्गावरील टोल नायाजवळ गोवंश जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी १३ जनावरे व बोलेरो पिकअप वाहन असा एकूण सुमारे ६.६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ९ एप्रिल रोजी करण्यात आली.
 
 
transportation of cattle
 
मिळालेल्या माहितीनुसार, वाशीम येथील नियंत्रण कक्षातून सूचना मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एमएच २७ बीएस ८४२४ क्रमांकाच्या बोलेरो पिकअपमध्ये गोवंश जनावरे अत्यंत क्रूर व निर्दयतेने अपुर्‍या जागेत कोंबून ठेवलेली आढळून आली. जनावरांचे पाय व तोंड आखूड दोरीने बांधलेले होते. तसेच त्यांना चारा व पाण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नव्हती. पोलिसांनी पंचासमक्ष कारवाई करून १.६५ लाख रुपयांची १३ गोवंश जनावरे व सुमारे ५ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ६.६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.transportation of cattle याबाबत कारंजा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्राण्यांना निर्दयतेने वागणूक अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५, महाराष्ट्र पोलिस अधिनियम तसेच मोटार वाहन कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
दरम्यान, जप्त केलेली जनावरे पुढील देखभालीसाठी कारंजा येथील पांजरपोळ संस्थेत दाखल करण्यात आली असून त्यांची पशुवैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुला यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार मयुरेश तिवारी करत आहे.