मिर्झापूर,
Lawyer shot dead मिर्झापूर येथे कायदा-सुव्यवस्थेला हादरा देणारी घटना घडली असून, ज्येष्ठ वकील आणि गावप्रमुख राजीव सिंग उर्फ रिंकू यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना कटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून संपूर्ण प्रकार जवळच्या देखरेखीच्या कॅमेऱ्यात नोंदवला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या रिंकू सिंग यांच्यावर दोन हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. मोटारसायकलवरून आलेल्या या आरोपींपैकी एकाने खाली उतरून अतिशय जवळून गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या रिंकू सिंग यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या चित्रफितीत गोळीबारानंतर आरोपींची मोटारसायकल काही क्षण सुरू होत नसल्याचे दिसते. त्यावेळी आजूबाजूचे काही लोक त्यांना पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, मागे बसलेल्या आरोपीने शस्त्र दाखवून त्यांना घाबरवले आणि त्यानंतर मोटारसायकल सुरू होताच दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. ही संपूर्ण घटना कटवारू परिसरात घडली असून, पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.