नागपूर,
Sarvodaya Ashram सर्वोदय आश्रमाच्या पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांनी समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य करत महत्त्वपूर्ण विचार मांडले. या वेळी डॉ. मनोज नरांजे यांनी शिक्षकांच्या भूमिकेवर भाष्य करताना, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रात प्राथमिक स्तरावर अनेक अडचणी आणि दबावाखाली काम करावे लागते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शिक्षकांवरील विश्वास कमी होत चालल्याची खंत व्यक्त करत, पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत मानवी मूल्यांचे शिक्षण पोहोचवले तर संस्कारीत पिढी घडू शकते, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनीही सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत काही प्रमाणात निराशा व्यक्त केली, मात्र पुढील पिढीसाठी आशेचा किरण निर्माण करण्याची गरज असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पुरस्कारप्राप्त मान्यवरांनीही आपली मते मांडताना सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. हा पुरस्कार सोहळा समाजभान आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा ठरल्याचे सर्वांनी नमूद केले. Sarvodaya Ashram कार्यक्रमाला स्वातंत्र्य सेनानी लिलाताई चितळे, वंदना मोहोड, अरुण माणकर, बबन नाखले तसेच मोठ्या संख्येने शिक्षकवृंद उपस्थित होते.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र