सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग : तीन जणांचा मृत्यू

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
मिरा-भाईंदर
Mira Bhayandar fire मुंबई महानगर प्रदेशातील मिरा-भाईंदर परिसरात झालेल्या भीषण आगीच्या घटनेने मोठी हानी झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. इंद्रलोक फेज-4 परिसरातील आरक्षित भूखंडावरील झोपडपट्टीत रात्री सुमारे 8 वाजता लागलेल्या आगीत 50 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या, तर अनेक नागरिक जखमी झाले.
 

Mira Bhayandar fire 
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर झोपडपट्टीत एकापाठोपाठ तीन गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याने आगीने भीषण रूप धारण केले आणि संपूर्ण वस्ती काही मिनिटांतच आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.आग लागल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. रहिवासी आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते, तर झोपड्यांतील साहित्य, अन्नधान्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तू क्षणात जळून राख झाल्या. या घटनेत काही नागरिक गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला.
 
 
मृतांमध्ये उत्तर प्रदेशातील गुड्डू राम (46), तसेच पश्चिम बंगालमधील Mira Bhayandar fire दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सुरज लियाकत अली मंडळ (14) आणि रोहित रहेमत अली मंडळ (15) अशी त्यांची नावे असून, आगीत ते गंभीररीत्या होरपळल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.आग पूर्णपणे विझवल्यानंतर केलेल्या तपासणीदरम्यान 24 बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या सिलेंडरचा एवढा मोठा साठा झोपडपट्टी परिसरात कसा आणि कुणी जमा केला, याबाबत प्रशासनाकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. काही सिलेंडर जप्त करण्यात आले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास पुढे सुरू आहे.या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून बाधित कुटुंबांना तातडीची मदत आणि पुनर्वसनाची मागणी केली जात आहे.