भारतातील पहिली नॉन एसी बंद दरवाज्याची लोकल ट्रेन

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
मुंबई
local train शहरातील वाढती लोकल गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबईत लवकरच भारतातील पहिली नॉन एसी, बंद दरवाज्यांची लोकल ट्रेन धावणार असून ही १२ डब्यांची विशेष प्रोटोटाईप ट्रेन आहे. या लोकलचा क्रमांक 268201-268212 असा असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी करण्याचा उद्देश यामागे आहे.
 

Mumbai non AC closed door local train 
चेन्नई येथील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये या लोकलचे आधुनिक डिझाईन तयार करण्यात आले आहे. ही वेस्टिब्युल प्रकारातील ट्रेन असून, सहा-सहा डब्यांचे दोन युनिट्स त्यात असतील. त्यामुळे एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाता येणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र आरक्षित डब्बे असतील, मात्र या लोकलमध्ये फर्स्ट क्लास डब्बा नसेल, ही बाब विशेष लक्षवेधी आहे.या लोकलमधील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे बंद दरवाज्यांची व्यवस्था. ऑटोमॅटिक दरवाज्यांमुळे प्रवाशांना दरवाजात उभे राहणे किंवा लटकणे शक्य होणार नाही, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. गर्दीच्या वेळी ही लोकल विशेषतः चालवली जाणार असून, प्रवाशांची सुरक्षितता आणि शिस्त राखण्यावर भर दिला जाणार आहे.नॉन एसी असूनही डब्ब्यातील हवा खेळती राहावी यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक डब्ब्याच्या छतावर व्हेंटिलेशन युनिट्स आणि ब्लोअर्स बसवण्यात आले आहेत. यामुळे सतत ताजी हवा डब्यात फिरत राहील आणि प्रवाशांना उकाडा किंवा दमटपणाचा त्रास होणार नाही. पावसाळ्यात local train पाणी आत येऊ नये यासाठीही या ब्लोअर्सचे डिझाईन विशेष पद्धतीने करण्यात आले आहे.
याशिवाय, ट्रेनमध्ये सेन्सर-आधारित दरवाजे, टॉकबॅक प्रणाली, तसेच स्टेशनची माहिती देणारे डिजिटल डिस्प्ले बोर्ड बसवण्यात येणार आहेत. डब्ब्यात कार्बन डायऑक्साईड साचू नये यासाठीही विशेष तांत्रिक सुविधा देण्यात आल्या आहेत.मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे लोकल ट्रेनवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो आणि वॉटर टॅक्सी सारखे पर्यायही विकसित करण्यात येत आहेत. मात्र, पारंपरिक लोकल सेवा अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम बनवणे ही काळाची गरज असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, या नव्या लोकलच्या काही चाचण्या अद्याप बाकी असून, त्या पूर्ण झाल्यानंतरच ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये या अत्याधुनिक लोकलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.