पशुवैद्यकीय दवाखाना महिन्यांपासून बंद

शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
शिरूर
Pabal veterinary hospital पाबळ परिसरातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने स्थानिक शेतकरी आणि पशुपालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. शासनाकडून उभारण्यात आलेली सुसज्ज इमारत असूनही येथे नियमित सेवा सुरू नसल्याने आणि वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित राहत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
 

Pabal veterinary hospital  
दवाखान्यासाठी अतिरिक्त जबाबदारीवर नेमण्यात आलेले वैद्यकीय अधिकारीही नियमितपणे उपलब्ध नसल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात येत आहेत. “डॉक्टर आले तर आले, नाहीतर दवाखाना दिवसभर कुलूपबंदच असतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पशुधनाच्या उपचारासाठी नागरिकांना खासगी पशुवैद्यकीय सेवांवर अवलंबून राहावे लागत असून, त्याचा आर्थिक भार वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या दवाखान्याच्या बाहेर Pabal veterinary hospital कोणताही नामफलक किंवा सेवा माहिती फलक नसल्याने हा केंद्र कार्यरत आहे की नाही, याबाबतही ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पाबळ, पिंपळवाडी, खैरेनगर तसेच परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या आणि पाळीव कुत्र्यांच्या उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तातडीच्या उपचारांमध्ये विलंब होत असल्याने पशुधनाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.शासनाने लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही इमारत वापराअभावी निष्क्रिय पडून असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. प्रशासन आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.दरम्यान, या परिस्थितीमुळे पशुधनाच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाबळ परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमून तातडीने सेवा सुरू करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.