सिंदीरेल्वे,
Selu APMC farmers bhavan foundation स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू येथील उपबाजारपेठेच्या आवारात शेतकर्यांच्या सुविधेसाठी नियोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधकामाचे भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले. पणन संचालनालयाच्या मंजुरीनंतर १ कोटी २५ लाख ६८ हजार ९०६ रुपयांच्या कामाला आता सुरुवात होणार आहे. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती केसरीचंद खंगारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वर्धेचे माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे होते.
पणन संचालनालय यांच्याकडून या कामाच्या निविदेला मंजुरी मिळाली होती. कंत्राटदाराला यापूर्वीच कार्यारंभ आदेश देण्यात आला असून विहित मुदतीत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या शेतकरी भवनामुळे परिसरात येणार्या शेतकर्यांना निवासाची आणि इतर सोयींची तजवीज करण्यात येईल, असे सभापती खंगारे यावेळी म्हणाले. याप्रसंगी बाजार समितीचे सदस्य श्याम वानखेडे, संजय काकडे, वरुण दफ्तरी, बाजार समितीचे सचिव महेंद्र भांडारकर, लेखापाल अंबागडे, पर्यवेक्षक अमोल ढोक, केतन मुटे, कंत्राटदार बादल पोवळे आदी उपस्थित होते.