प्रेमात आलेले अपयश आणि शिक्षणाच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
- बुटीबोरीत फार्मसीच्या विद्यार्थिनीचा गळफास

अनिल कांबळे
नागपूर : प्रेमात आलेले अपयश आणि अभ्यासाचा ताण या विवंचनेत अडकलेल्या एका तरुणीने घरात गळफास घेऊन suicide आत्महत्या केली. ही घटना बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे घडली. आस्था (वय २१, रा. शास्त्रीनगर, भद्रावती) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.
 

suicide 
 
suicide  चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील रहिवासी असलेली आस्था, तुळशीराम गायकवाड पाटील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती बुटीबोरी जवळील सातगाव (म्हसाळा) येथे चंदन पोंगळे यांच्या घरी भाड्याने खोली घेऊन राहत होती. बुधवार दि. ८ एप्रिल रोजी रात्री १०:३० च्या सुमारास ती घरच्यांचे फोन उचलत नसल्याने तिच्या आईने नागपूरला असलेल्या नातेवाईकांना कळवले. तिचे चुलत भाऊ प्रणय यांनी तातडीने सातगाव गाठले असता, आस्थाने रूममधील सीलिंग फॅनला दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले. मृत आस्थाने यापूर्वी दोन वेळा 'नीट' परीक्षेसाठी 'ड्रॉप' घेतला होता. मात्र, अपेक्षित यश मिळत नसल्याने ती सतत चिडचिड करत असे आणि मानसिक तणावात राहत होती. त्यातच तनय नावाच्या तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधात काही काळापासून दुरावा निर्माण झाला होता. शैक्षणिक अपयश आणि प्रेमभंगाचे दुःख अशा दुहेरी संकटात सापडलेल्या आस्थाने अखेर टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी मृत मुलीचा भाऊ प्रणय यांच्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. ‘माझा कोणावरही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संशय नाही,’ असे त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक व त्यांचे पथक करत असून, सुसाईड नोट अधिक तपासासाठी ताब्यात घेण्यात आली आहे.
 
 
सुसाईड नोटमध्ये काय आहे?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी पोलिसांना आस्थाने लिहिलेली एक 'सुसाईड नोट' सापडली. इंग्रजी भाषेत लिहिलेल्या या चिठ्ठीत तिने नमूद केले आहे की, 'मी माझ्या इच्छेने हे पाऊल उचलत असून माझ्या मृत्यूला कोणालाही दोषी ठरवू नये.' जरी तिने कोणाला जबाबदार धरले नसले तरी, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाचे पदर आता समोर येत आहेत.