मूल येथील ‘बुकिंग’ घोटाळ्याचे धागेदोरे इंदोरपर्यंत

* मुख्य सूत्रधाराला अटक दीडशेहून अधिक नागरिकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
मूल, 
booking scam गेल्या काही दिवसांपासून मूल शहरात चर्चेत असलेल्या संशयास्पद ‘बुकिंग’ प्रकरणाला आता मोठे वळण आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राज नारायण याला मध्यप्रदेशातील इंदोर पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. या अटकेची माहिती शहरात वार्‍यासारखी पसरताच, मूलमधील संबंधित दुकान बंद झाले असून, पैसे भरलेल्या शेकडो नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.
 
 

booking scam 
 
 
शहरात स्वस्त दरात वस्तू देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर बुकिंग सुरू होते. सुरुवातीला काही लोकांना वस्तू देऊन विश्वास संपादन करण्यात आला, त्यानंतर आधी पैसे भरा, नंतर माल मिळेल, या धर्तीवर लाखो रुपये गोळा करण्यात आले. मात्र, इंदोरमधील अटकेच्या बातमीने हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा (पॉन्झी स्कीम) असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या संबंधित दुकानाचे शटर बंद असून कोणतीही हालचाल दिसत नाही. आपले कष्टाचे पैसे परत मिळणार का, या चिंतेने नागरिक दुकानाबाहेर चकरा मारत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, यात 150 ते 200 नागरिकांची गुंतवणूक असून, हा आकडा लाखो ते कोट्यवधींच्या घरात असण्याची शक्यता आहे. यामध्ये मध्यमवर्गीय, गरीब नागरिकांसह शिक्षक आणि उच्चभ्रू वर्गाचाही समावेश असल्याची चर्चा आहे.
या प्रकरणावर बोलताना मूलच्या ठाणेदारांनी इंदोर पोलिसांनी राज नारायण याला मालविक्रीतील फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. मात्र, मूलमध्ये अद्याप एकाही नागरिकाने अधिकृत तक्रार नोंदवलेली नाही. ज्या नागरिकांनी या स्कीममध्ये पैसे भरले आहेत, त्यांनी आपली पावती आणि आधार कार्डच्या झेरॉक्ससह पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तक्रार प्राप्त झाल्याशिवाय कायदेशीर कारवाई करणे कठीण आहे, असेही ठाणेदारांनी म्हटले आहे.