मुंबई,
Tighi Marathi movie मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘तिघी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात यशस्वीपणे सुरू आहे. आशयघन कथा, दमदार अभिनय आणि प्रभावी भावनिक मांडणी यामुळे ‘तिघी’ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आता या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, ‘तिघी’ची प्रतिष्ठित न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2026 (एनवायआयएफएफ)मध्ये क्लोजिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली आहे.
‘तिघी’ क्लोजिंग नाईट फिल्म म्हणून जाहीर करण्यात आले असून, या घोषणेमुळे चित्रपटाच्या यशात आणखी भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दखल मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. आई-मुलीच्या नात्यांतील गुंतागुंत, त्यांच्या मनात दडलेले भावविश्व, न बोललेले संवाद आणि काळानुसार बदलणारे नाते या सगळ्यांचा अत्यंत सूक्ष्म आणि वास्तववादी वेध या चित्रपटात घेतला आहे. कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा आणि त्यांची नैसर्गिक अभिनयशैली यामुळे ‘तिघी’ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.