अहेरी,
remote areas of aheri गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील तरुणाई आता केवळ स्वप्न पाहत नसून ती सत्यात उतरवत आहे. अहेरी उपविभागातील अत्यंत सामान्य परिस्थिती असलेल्या तीन विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सरकारी नोकरीला गवसणी घातली आहे. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड आणि ‘मियाम’ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चालवल्या जाणार्या अकादमीतील प्रशिक्षणाने या तरुणांच्या यशाला खर्या अर्थाने दिशा दिली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतलपेठ येथील दिपाली भाऊराव चुनारकर, अकारपल्ली येथील वंदना भीमराव आत्राम आणि खमणचेरू येथील तिरुपती विकास मडावी यांचा समावेश आहे. या यशाने दुर्गम भागातील पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून परिवर्तनाची नवी लाट निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
दिपाली चुनारकर हिची निवड कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून निमलष्करी दलात झाली आहे. दिपालीचे आई-वडील गावपातळीवर छोटेसे किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक ओढाताण असूनही तिने प्रशिक्षणात सातत्य ठेवले. दुसरीकडे, वंदना आत्राम आणि तिरुपती मडावी यांची गडचिरोली पोलिस दलात निवड झाली आहे. वंदनाचे आई-वडील शेतमजूर असून त्यांनी मोलमजुरी करून लेकीच्या शिक्षणासाठी तिला गावाबाहेर पाठवले. तर तिरुपती हा पदवीधर असूनही अनेक वर्षांपासून रोजगाराच्या शोधात होता. मियाम अकादमीच्या मार्गदर्शनामुळे त्याच्या कष्टाला फळ मिळाले आहे.
‘हर घर नोकरी’चा संकल्प
सुरजागड इस्पात आणि मियाम ट्रस्टने चिंतलपेठ येथे सुरू केलेली ही मोफत अकादमी दुर्गम भागातील तरुणांसाठी आधारवड ठरत आहे. ‘हर घर नौकरी, जीवनभर रोशनी’ या ब्रीदवाक्यासह सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर शारीरिक चाचणीसाठी लागणारे मैदानी प्रशिक्षणही मोफत दिले जाते.remote areas of aheri विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारी पुस्तके, स्टेशनरी, गणवेश आणि प्रवासासाठी बसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अष्टपैलू प्रशिक्षण आणि तज्ज्ञ मार्गदर्शक
या अकादमीत युपीएससी, एमपीएससीसह पोलिस भरती, लष्करी भरती आणि रेल्वे अशा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. निवृत्त पॅरा कमांडो सुमेर सिंग यांच्या देखरेखीखाली मैदानी प्रशिक्षण दिले जाते, तर गणित आणि सामान्य ज्ञानासाठी पंकज पोटे व महेश अलोने यांसारखे तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करत आहेत. जिल्ह्यातील खाण प्रकल्प आणि औद्योगिक विकासामुळे स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळावे, यासाठी अशा प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांची मोठी मदत होत असल्याचे मत मियामच्या प्रमुख नितु जोशी यांनी व्यक्त केले आहे.