महासती चैतन्यश्री यांचा उपदेश
वाशीम,
कुटुंबामध्ये एकता आणि ते संघटित असावयास पाहिजे. एकत्रित कुटुंबात प्रत्येक व्यक्ती सुरक्षित आहे. कुटुंबातील सदस्यांवर काही संकटे आली तर त्याला सहजपणे तोंड देणे शक्य होते. एकतेची ताकद ही फार मोठी आहे. त्यामुळे माझे कुटुंब माझी शक्ती ही संकल्पना अंमलात आणून संयुक्त परिवार निर्माण करा, असा उपदेश कोटा संघ प्रमुख प्रकाशकंवर यांची शिष्या Chaitanyashri Maharaj चैतन्यश्री महाराज यांनी आज, १२ एप्रिल रोजी सकाळी आपल्या प्रवचनात दिला.
स्थानिक तिरुपती सिटी येथे Chaitanyashri Maharaj चैतन्यश्री यांच्यासह साध्वी जिज्ञासा, साध्वी सुबोधिजी, साध्वी निर्मिती आदी उपस्थित होते. तिरुपती सिटी येथील रहिवासी तथा श्री वर्धमान जैन स्थानकचे अध्यक्ष शीतलकुमार भागचंद गेलडा यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात महासती चैतन्यश्री महाराज यांच्या माझे कुटुंब माझी शक्ती या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी आपल्या उपदेशात चैतन्यश्री पुढे म्हणाल्या की, मागील काही वर्षांपासून इतिहासात प्रत्येक लहान मोठ्या खेड्यात, शहरात प्रत्येक कुटुंब व परिवार संयुक्त म्हणजे एकत्रित राहायचा. मात्र, आता आधुनिक विचारांच्या आणि अतिशिक्षित पिढीमुळे संयुक्त कुटुंबाची संकल्पना संपुष्टात आली आहे. आता फक्त पती, पत्नी व स्वतःची अपत्ये ही भावना निर्माण झाली. पूर्वीच्या काळात संयुक्त कुटुंबाची ताकद फार मोठी शक्ती होती. वर्तमानात पुन्हा संयुक्त कुटुंब पद्धती निर्माण होने अत्यंत आवश्यक झाले आहे. माझे कुटुंब हीच माझ्या आयुष्याची खरी शक्ती आहे, हे ओळखून संयुक्त कुटुंब परिवार निर्माण करा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित भाविक भक्तगण व श्रोत्यांना केले. याप्रसंगी साध्वी जिज्ञासा यांनी मनुष्याच्या जीवनात जे प्राप्त आहे ते पर्याप्त असून, अनावश्यक इच्छा व आकांक्षावर अंकुश ठेवा असे विचार मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अभय गेलडा, विजय गेलडा, अक्षय गेलडा व श्वेतांबर जैन समाजाच्या युवक मंडळाने परिश्रम घेतले.