हाजराफॉलात कर्मचार्यांची ‘दादागिरी’! पर्यटकांना त्रास
दिनांक :12-Apr-2026
Total Views |
- मराठी भाषेचाही अवमान : पुराव्यासह वनविभागाकडे तक्रार दाखल
गोंदिया,
जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ 'Hajra Fall' tourists ‘हाजरा फॉल’ येथे पर्यटकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील कर्मचार्यांकडून येथे आलेल्या पर्यटकांसोबत उद्धट वर्तणूक, आर्थिक अनियमितता तसेच राज्यभाषा मराठीचा अवमान होत असल्याच्या आरोप काही पर्यंटकांनी केला असून या संदर्भात भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील सामाजिक कार्यकर्ते अमित मेश्राम, पुष्पक त्रिभुवनकर व निखील कटारे यांनी सालेकसाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश घुटके यांच्याकडे शनिवारी ११ एप्रिल रोजी लेखी तक्रार दाखल केली आहे.
'Hajra Fall' tourists सादर तक्रारीनुसार, हाजरा फॉलच्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात कर्मचारी पर्यटकांशी अरेरावीने वागत असून, साधी चौकशी केली असता अपमानास्पद उत्तरे दिली गेली. विशेष म्हणजे, प्रवेश शुल्क आकारूनही अधिकृत पावती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार शासकीय कामकाज मराठीतून करण्याची सक्ती असताना, येथील कर्मचारी मराठीत संवाद साधण्यास टाळाटाळ करीत असल्याचे आरोप असून मराठीत प्रश्न विचारणार्या पर्यटकांचा उपहास करण्यात येत असल्याचे दिसून आले. दरम्यान, स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, मनसेचे शहराध्यक्ष निखील कटारे व उपाध्यक्ष पुष्पक त्रिभुवनकर यांनी कर्मचार्यांच्या वर्तणुकीचे व्हिडीओ पुरावे सादर करत कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीची प्रत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक तसेच जिल्हा उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग यांनाही पाठविण्यात आली आहे. यावेळी अश्विन देशमुख, रोशन ढोके, विजेंद्र महाकाळकर, आशिष माटे, विवेक डहरवाल, मनिष गुरवे, लोकेश कामथे, हर्षल मलेवार यांच्यासह अनेक पर्यटक उपस्थित होते.