मुंबई
Asha Bhosale death ज्येष्ठ आणि दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशभर शोककळा पसरली असून विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळाचा एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करत आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘आशाताई – दि लास्ट एम्परर’ असे शीर्षक देत त्यांनी आशा भोसले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कलेचा सखोल आढावा घेतला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन्ही बहिणींची तुलना युरोपियन पुनर्जागरण काळातील लिओनार्दो दा विंची आणि मायकलअॅन्जेलो यांच्याशी केली आहे. लता मंगेशकर यांच्या गायनातील परिपूर्णता, स्थैर्य आणि आध्यात्मिकता यांचा उल्लेख करताना त्यांनी आशा भोसले यांच्या गाण्यातील नजाकत, आवेग, खेळकरपणा आणि बंडखोरी यांचा विशेष उल्लेख केला आहे.
आशा भोसले यांच्या संघर्षमय आयुष्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, अत्यंत लहान वयात कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी आपल्या नैसर्गिक आवाजाच्या बळावर गायन क्षेत्रात प्रवेश केला. वैयक्तिक आयुष्यातील अनेक अडचणी आणि दुःखांना सामोरे जात त्यांनी त्या अनुभवांना आपल्या कलेत रूपांतरित केले, ज्यामुळे त्यांच्या गायकीला एक वेगळाच भावस्पर्शी आयाम प्राप्त झाला.‘पिया तू अब तो आजा’, ‘आईये मेहरबान’, ‘दिल चीज क्या है’ आणि ‘दम मारो दम’ यांसारख्या विविध छटांच्या गाण्यांचा उल्लेख करत ठाकरे यांनी आशा भोसले यांच्या बहुआयामी गायकीची प्रशंसा केली. त्याचबरोबर मराठी भावसंगीतातील त्यांच्या योगदानाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.
राज ठाकरे यांनी आपल्या Asha Bhosale death पोस्टमध्ये नमूद केले की, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांसारख्या कलाकारांनी भारतीय समाजाच्या भावविश्वाला आकार दिला. त्यांच्या कलेमुळेच समाजात सौंदर्य, संवेदनशीलता आणि उच्च मूल्यांची जपणूक झाली. “या दोन्ही दिग्गज बहिणींचा सहवास लाभणे हे माझे भाग्य आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे.पोस्टच्या शेवटी त्यांनी असेही नमूद केले की, काही वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता आशा भोसले यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसंगीताच्या ‘रेनेसाँस’ युगाचा शेवटचा महत्त्वाचा घटक हरपला आहे. “आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून त्या सदैव रसिकांच्या मनात जिवंत राहतील, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.