चिंता वाटली.. लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात

आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत पंतप्रधान मोदींची पोस्ट

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
मुंबई
Asha Bhosle ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. छातीत संसर्ग आणि प्रचंड थकवा जाणवल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी उपचारांना प्रतिसाद मिळत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
 

Asha Bhosle 
आशा भोसले यांच्या नात झनाई भोसले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आजीच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “अत्यंत थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या लवकर बऱ्या होतील, अशी आम्हाला आशा आहे. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करावा.” झनाई यांनी पुढे सकारात्मक बातमी लवकरच देण्याचा विश्वासही व्यक्त केला.
दरम्यान, या वृत्तानंतर देशभरातून चिंता व्यक्त केली जात असून विविध स्तरांवरून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत आशा भोसले यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. “आशा भोसलेजी यांना रुग्णालयात दाखल केल्याचं ऐकून मला अत्यंत चिंता वाटली. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी मी प्रार्थना करतो,” असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
आशा भोसले या भारतीय संगीतविश्वातील Asha Bhosle एक दिग्गज नाव असून गेल्या आठ दशकांहून अधिक काळ त्या सक्रिय आहेत. विविध भाषांमध्ये आणि विविध संगीतप्रकारांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांच्यानंतर भारतीय पार्श्वसंगीताच्या क्षेत्रात त्यांचे स्थान अत्यंत मानाचे मानले जाते. त्यांनी आर. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर, ए. आर. रेहमान यांसारख्या नामवंत संगीतकारांसोबत काम करत संगीतविश्वात अमिट ठसा उमटवला आहे.२०२३ मध्ये दुबई येथे त्यांनी आपल्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त विशेष संगीत मैफिल सादर केली होती, ज्यातून त्यांच्या कार्यक्षमतेचा आणि संगीतावरील प्रेमाचा प्रत्यय आला होता. सध्या त्यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत वैद्यकीय बुलेटिनची प्रतीक्षा असून चाहत्यांकडून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना व्यक्त होत आहेत.