आशा भोसले यांचा अमरावतीत 'डिलीट'ने सन्मान

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
अमरावती विद्यापीठाने दिली होती उपाधी
 
अमरावती, 
बहुआयामी आणि अजरामर स्वराच्या धनी Asha Bhosle आशा भोसले यांचे रविवारी निधन झाल्यानंतर त्यांच्या अमरावती येथील आठवणींना उजाळा मिळाला. त्यांना 1987 साली अमरावती विद्यापीठाने दीक्षांत समारंभात डिलीट पदवी देऊन सन्मानित केले होते. अमरावती विद्यापीठाची स्थापना 1983 मध्ये झाली. तेव्हा विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात अमरावती विद्यापीठाचे कामकाज चालायचे. 1987 साली विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत सोहळ्यात प्रथम कुलगुरू डॉ. के. जी. देशमुख यांनी आशा भोसले यांना डिलीट उपाधी देऊन सन्मानित केले होते. तत्कालीन व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रा. डॉ. डॅडी देशमुख यांचा प्रस्ताव मंजूर झाल्यावर अमरावती विद्यापीठाने आशा भोसले यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होता.
 
 
Asha Bhosle
 
आमच्या कुटुंबाच्या कठीण काळात अमरावतीकर प्रेक्षकांनी सातत्याने मदत केली असे माझी आई नेहमीच सांगायची. आज मी इतकी शिकली नसतानाही अमरावती विद्यापीठाने माझा डिलीट देऊन गौरव केला हा माझ्यासाठी महत्त्वाचा क्षण असल्याची भावना त्यावेळी आशा भोसले यांनी व्यक्त केली होती, असे अमरावती विद्यापीठाचे तेव्हाचे जनसंपर्क अधिकारी प्रा. डॉ. किशोर फुले यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितले.
 
 
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. मिलिंद बाराहाते, प्र कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असणारे यांनी Asha Bhosle आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केल्याचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी कळविले आहे.