कोलकाता,
chandra-kumar-bose : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केला आहे.
त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चंद्र कुमार बोस यांनी यापूर्वी भारतीय जनता पक्षाशी (बीजेपी) असलेला दीर्घ संबंध संपवला होता. त्यांनी पक्षाच्या विचारसरणीवर नाराजी व्यक्त करत “विभाजनकारी राजकारण” असल्याचा आरोपही केला होता.
टीएमसीमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला विशेषतः हिंदू मतदारांमध्ये बळ मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर विरोधकांनी या घडामोडीकडे आगामी निवडणुकीतील रणनीतीचा भाग म्हणून पाहिले आहे. पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत असल्याचे चित्र दिसत आहे. एकूणच, नेताजींच्या कुटुंबातील महत्त्वाच्या सदस्याच्या प्रवेशामुळे बंगाल राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.