शाळा परिसरात टपर्‍या नकोच

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
शाळा-महाविद्यालय परिसरातील अवैध टपर्‍या हटवा
नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण विकास कामे करा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट शब्दात निर्देश
- पाणी गळती तातडीने थांबवा
- ९ झोनमध्ये ८९ किमीचे १३५ रस्ते प्रस्तावित
 
नागपूर,
शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात अवैध टपर्‍या, मसाल्याच्या दुकानांची संख्या सतत वाढत आहे, अशी सर्व दुकाने तातडीने हटविण्यात यावी. रस्ते वाहतूकीला अडथळा निर्माण करीत असलेल्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण करण्यात आले आहे. असे सर्व प्रकारचे अतिक्रमण हटविणे तातडीने आवश्यक झाले आहे. याशिवाय महामार्गावरील बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्याच्या सूचना Chief Minister Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्या.
 
 
devendra-fadnvis-1
 
नागपूर महानगर पालिका,एमएसआयडीसी, मिहान,विभागीय क्रीडा संकुल, वैद्यकीय शिक्षण व सुविधा आणि म्हाडा अंतर्गत शहरातील विविध विकास प्रकल्प नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याची दक्षता घेण्याच्या सूचना Chief Minister Devendra Fadnavis  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मुख्यमंत्री सचिवालय, हैदराबाद हाऊस येथे नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत आढावा आला. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी ,महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार माया इवनाते, आमदार मोहन मते, आ.कृष्णा खोपडे, महापौर निता ठाकरे, गृह निर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी उपस्थित
पार्किंग संदर्भात तोडगा काढावा - नितीन गडकरी
नागपूर महानगरपालिकेअंतर्गत १ लाख लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये झोननिहाय भाजी बाजार, मटन-मच्छी मार्केट, फूड मॉल, हॉकर्स झोन उभारण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ही कामे पूर्ण करताना पार्किंगची योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले त्यासाठी ’एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन आधार घ्यावा व आवश्यक बदल करावे, अशा सूचनाही केल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पार्किंग संदर्भात तोडगा काढावा अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या.
सिमेंट रस्त्यांची कामे प्रस्तावित
मुख्यत: सक्करदरा बाजार, सोख्ता भवन, बुधवार बाजार आणि ५व्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची शहरातील विकास कामे पूर्ण करताना समस्यांचा निपटारा करावा. ९ झोनमध्ये ८९ किमीचे १३५ रस्ते प्रस्तावित आहेत. शहरातील चहुबाजूने पाणीपुरवठा केल्या जात आहे. मात्र अनेक ठिकाणी पाणी गळती होत असल्याने ही पाणी गळती तातडीने थांबविण्याशिवाय पर्याय नाही,यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले.
 
संत्रा मार्केट, कॉटन मार्केटचा पुनर्विकास
शहरातील अनेक ठिकाणी कचरा साचलेला दिसून येतो. कचरा व्यवस्थापनाबाबत योग्य करण्यात यावे, इतर शहरांमध्ये कचरा व्यवस्थापनाचा अभ्यास करावा, तसेच आदर्श पद्धतींच्या आधारे कचरा व्यवस्थापन करावे. संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, नेताजी मार्केट आणि डींक दवाखाना यांच्या पुनर्विकास करताना घ्यावयाच्या काळजी बाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
क्रीडा संकुलात सौर ऊर्जेचा वापर
दाभा येथील इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरच्या स्थितीची माहिती यावेळी देण्यात आली. विभागीय क्रीडा संकुला बाबत सौर ऊर्जेचा वापर करणे, वेळोवेळी कामाची गुणवत्ता तपासणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह, प्रशासकीय इमारत, क्रीडांगण उभारणे आदी सुरू असलेल्या विकास कामांची माहिती यावेळी देण्यात आली.
गटार योजनेसाठी निधी उपलब्ध
यशवंत स्टेडियम पुनर्विकास प्रकल्प, नाग व पोहरा नदी प्रकल्पांची प्रगती, वाढत्या लोकसंख्येसाठी भुयारी गटार योजना, सांडपाणी व्यवस्थापन, पावसाळी नाले व सांड पाणी वाहून नेणार्‍या पाइपलाइनसाठी निधी उपलब्ध होण्याबाबत चर्चा झाली.काचीपुरा कृषी महाविद्यालय परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबतही चर्चा झाली.
प्रस्तावित विकास कामांचा आढावा
या बैठकीत शहरातील कामाशी संबंधित महानगर पालिका,महाराष्ट्र -राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ , महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या. नागपूर (मिहान), क्रीडा विभाग,वैद्यकीय शिक्षण आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) अंतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.