- उच्च न्यायालयाचा निर्णय
अनिल कांबळे
नागपूर,
Cyber fraud सायबर फसवणुकीच्या गंभीर प्रकरणात अडकलेल्या एका व्यावसायिकाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. याचिकेवर न्यायमूर्ती एम.डब्ल्यू. चांदवाणी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उल्हास घनश्याम धाबर्डे (45) असे अर्जदाराचे नाव आहे.
Cyber fraud नागपूर सायबर पाेलिस ठाण्यात नाेंद असलेल्या गुन्ह्यात एका व्यक्तीला ‘डिजिटल अटक’ची धमकी देत 1.40 काेटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या रकमेपैकी 11 लाख रुपये धाबर्डे याच्या ‘ग्रीनवेल इम्पेक्स’ या भागीदारी फर्मच्या बँक खात्यात जमा झाल्याचे पाेलिसांच्या तपासात समाेर आले. त्यामुळे सायबर पाेलिसांनी या गुन्ह्यात उल्हास धाबर्डे याच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र, अर्जदाराने न्यायालयात स्पष्ट केले की, त्यांचे बँक खाते फसवणूक करणाèया मुख्य आराेपींनी त्यांच्या नकळत ‘रूटिंग अकाउंट’ म्हणून वापरले. या व्यवहारांमधून त्यांना काेणताही आर्थिक ायदा झाला नसून उलट त्यांच्या स्वत:च्या खात्यातील सुमारे 1 लाख रुपयेही अनधिकृतरित्या काढण्यात आले आहे. धाबर्डे यांनी दावा केला की, स्पिरुलिना निर्यातीच्या व्यवसायाच्या नावाखाली त्यांची फसवणूक करण्यात आली. अर्जुन नावाच्या व्यक्तीने माेठ्या व्यवहाराचे आमिष दाखवत त्यांच्याकडून बँक तपशील घेतले. त्यानंतर काही संशयास्पद हालचाली लक्षात येताच त्यांनी स्वत:हून 22 डिसेंबर 2025 राेजी पाेलिसांकडे तक्रार केली हाेती. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आराेपी सुनील शिराेडकर याला पाेलिसांनी आधीच अटक केली असून अर्जदाराचा त्याच्याशी काेणताही संबंध नसल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. सत्र न्यायालयाने यापूर्वी धाबर्डे यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज नाकारला हाेता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असता त्यांना जामीन मिळाला. या प्रकरणातील पुरावे प्रामुख्याने कागदपत्रांवर आधारित असल्याने काेठडीची आवश्यकता नसल्याचेही सुनावणीदरम्यान वकिलांनी न्यायालयाला सांगितले. दाेन्ही बाजू ऐकून न्यायालयाने जामीन मंजूर केला.