स्नॅपचॅट’च्या माध्यमातून ओढले जाळ्यात
चार आरोपींना अटक, पाच दिवसांची पोलिस कोठडी
मूल,
Exploitation of minor girls मूल शहरात ‘स्नॅपचॅट’सारख्या समाजमाध्यमाचा गैरवापर करून अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार व आर्थिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजीव अमर डोंगरे (20), वेदांत बुरांडे (21) , प्रारब्ध कीर्तीवार (20) व कृष्णा व्यास (19 रा. सर्व मूल) या चौघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपी समाज माध्यमावरील ‘अॅप्स’च्या माध्यमातून मुलींशी ओळख वाढवत होते. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर खासगी चित्रफीत मिळवत होते. त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत पैशांसह दागिने उकळत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. एका प्रकरणात पीडित मुलीकडून घरातील दागिने घेतल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिस तपासात आरोपींनी लुटलेले दागिने गडचिरोली येथील सोनाराकडे विकून सुमारे 4.80 लाखांची बुलेट, 1.35 लाखांचा आयफोन व इतर महागड्या वस्तू खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून बुलेट, आयफोन व सुमारे 3.15 लाखांचे दागिने जप्त केले आहेत.
Exploitation of minor girls दरम्यान, आरोपींच्या मोबाईलमध्ये आणखी काही मुलींची चित्रफीत व फोटो असल्याची शक्यता व्यक्त होत असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रकरणाचा छडा लावून आरोपींवर कठोर कारवाई करावी व मूल शहरात कायदा-सुव्यवस्था राखावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, याप्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करण्याची मागणी केली आहे.