- चार लाखांचा मुद्देमाल जप्त
अनिल कांबळे
नागपूर,
IPL Cricket सध्या रंगात आलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेमधील चेन्नई विरुद्ध दिल्ली या टी-20 सामन्यावर ऑनलाइन सट्टा चालवणाऱ्या टाेळीच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेन छापा घातला. या छाप्यात चार सट्टेबाजांना अटककरण्यात आली असून सूत्रधार मात्र फरार झाला आहे. पाेलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रतापनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत आयटी पार्कजवळील लाेखंडे नगर परिसरातील सिद्धांत सक्षम अपार्टमेंटमधल्या सदनिकेतून हा अड्डा चालवला जात हाेता. पाेलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, चेन्नई विरुद्ध दिल्ली या टी-20आयपीएल सामन्यावर माेबाईलद्वारे ऑनलाइन पद्धतीने सट्टा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला लागली हाेती. पाेलिसांनी फफ्लॅट क्रमांक 401 वर छापा टाकत सामन्यावर ऑनलाईन सट्ट्यासाठी बाेली लावत असताना अमन परमानंद पाठक (26), आकाश जयंती गुहील (27), श्रेयस सप्तऋषी लांजेवार (21) आणि मुशीर अहमद मतीन अहमद (22) या चाैघांना अटक केली.
IPL Cricket सट्टा अड्डा चालवणारे हे आराेपी ‘एस.के.’ नावाच्या मुख्य सूत्रधाराशी संगनमत करून प्रतिबंधित लिंकद्वारे सामन्यासाठी खायवाडी करत असल्याचे समाेर आले. या लिंकच्या माध्यमातून ग्राहकांना युजर आयडी व पासवर्ड देऊन बँक खात्यांद्वारे पैशांची उलाढाल केली जात हाेती. या प्रकारातून फसवणूक केली जात असल्याचेही स्पष्ट झाले. कारवाईदरम्यान आराेपींकडून विविध कंपन्यांचे 11 माेबाईल, 11 बँक पासबुक असा एकूण 3 लाख 92 हजारांचा मुद्देमाल गुन्हे शाखेने जप्त केला. चाैघांनाही अटक करत पुढील कारवाईसाठी प्रतापनगर पाेलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.