नवी दिल्ली/तेहरान
Jag Vikram LPG tanker आंतरराष्ट्रीय ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुज जलडमरूमधून भारताचा ध्वज असलेला एलपीजी वाहक जहाज ‘जग विक्रम’ शनिवारी सुरक्षितपणे पुढे सरकला असून, तो आता भारताच्या दिशेने प्रवास करत आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हे जहाज सुमारे 20,400 मेट्रिक टन द्रवित पेट्रोलियम वायू (एलपीजी) घेऊन 24 नौकानयन कर्मचाऱ्यांसह भारताकडे येत आहे आणि 15 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे पोहोचण्याची अपेक्षा आहे.
जहाज ट्रॅकिंग डेटानुसार, शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळच्या दरम्यान ‘जग विक्रम’ने होर्मुज जलडमरूमधून सुरक्षित प्रवास केला आणि त्यानंतर ते पूर्व दिशेकडे पुढे सरकले. हे जहाज Great Eastern Shipping Companyचे असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. सुमारे 26,000 टन क्षमतेचे हे मध्यम आकाराचे गॅस कॅरियर जहाज आहे.मंत्रालयाने पुढे सांगितले की, मार्चच्या सुरुवातीपासून फारसच्या आखातातून बाहेर पडणारे हे नववे भारतीय ध्वजधारी जहाज आहे. सध्या या प्रदेशात अजूनही सुमारे 15 भारतीय ध्वज असलेली जहाजे उपस्थित असून ती सुरक्षित मार्गक्रमणाची प्रतीक्षा करत आहेत. यापूर्वी पश्चिम दिशेने असलेली आठ आणि पूर्व दिशेने असलेली दोन जहाजे यशस्वीरित्या सुरक्षितपणे बाहेर पडली आहेत.
दरम्यान, केवळ भारतीयच नव्हे तर भारतासाठी मालवाहतूक करणारी अनेक विदेशी ध्वजधारी जहाजेही अद्याप फारसच्या आखातात अडकून असल्याचे मरीन ट्रॅफिक डेटातून समोर आले आहे. या क्षेत्रात सध्या शेकडो जहाजांची उपस्थिती असून त्यात 426 टँकर, 34 एलपीजी वाहक आणि 19 एलएनजी जहाजांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर सरकारने स्पष्ट केले आहे की भारतातील बंदरांचे कामकाज सामान्यपणे सुरू असून कोणतीही मोठी अडचण किंवा गर्दी निर्माण झालेली नाही. तसेच नौवहन, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय आणि इतर संबंधित संस्था परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
भारत हा जगातील Jag Vikram LPG tanker तिसऱ्या क्रमांकाचा ऊर्जा उपभोक्ता आणि चौथा सर्वात मोठा गॅस उपभोक्ता देश आहे. देशाच्या गरजेपैकी सुमारे 88 टक्के कच्चे तेल, सुमारे 50 टक्के नैसर्गिक वायू आणि सुमारे 60 टक्के एलपीजी आयात केली जाते. या पुरवठ्याचा मोठा भाग पश्चिम आशियातील देशांकडून येतो आणि तो होर्मुज जलडमरूमधून पार होतो. हा मार्ग जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.अलीकडच्या काळात पश्चिम आशियातील तणावामुळे या समुद्री मार्गावर काही प्रमाणात परिणाम झाला होता. मात्र अलीकडेच अमेरिका आणि इराणदरम्यान सशर्त युद्धविरामावर सहमती झाल्यानंतर समुद्री मार्ग पुन्हा सुरळीत करण्याच्या प्रयत्नांना वेग मिळाल्याचेही सांगण्यात आले आहे.