अतिवृष्टीग्रस्तांना अद्याप मदत नाही

उपोषणाचा इशारा

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
कदमवाकवस्ती (पुणे)

Kadamwakvasti flood compensation delay कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत १४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्या राजश्री काळभोर यांनी जिल्हाधिकारी, पुणे यांना निवेदन देत प्रशासनातील निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत.
 
 
Kadamwakvasti flood compensation delay
निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीदरम्यान अनेक घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य, कपडे, फर्निचर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाच्या सूचनांनुसार ग्रामपंचायतीकडून पंचनामे करून ते वेळेत संबंधित महसूल कार्यालयात सादर करण्यात आले होते. मात्र पुढील प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अंतिम नुकसानग्रस्त यादीत अनेक पात्र नागरिकांची नावे वगळण्यात आली असून काही पंचनामे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलेच गेले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष नुकसान सोसलेल्या अनेक कुटुंबांना अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. या प्रकरणात संबंधित ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून त्यांच्या चौकशीसह निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.
या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास सोमवार (दि. १३ एप्रिल २०२६) पासून अप्पर तहसील कार्यालय, लोणी काळभोर येथे बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार लोणी काळभोर तसेच पोलीस प्रशासनालाही देण्यात आल्या असून, आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.