जगणे भेसळयुक्त होत आहे

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
रोखठोक. . .
 
दिनेश गुणे
adulterated milk ही जेमतेम दीड महिन्यापूर्वीची घटना आहे. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील लालाचेवरू, चौंदेश्वरनगर, स्वरूपनगर या भागांत गेल्या फेब्रुवारी महिन्यात अचानक काही लोकांना वेगळाच आजार सुरू झाला. मळमळ, उलट्या, पोटदुखीमुळे अनेक जण बेजार झाले. अनेकांना मूत्रविसर्जनदेखील करता येईनासे झाले. काहींची मूत्रपिंडे निकामी झाली आणि या आजाराने जिल्हा हादरून गेला. गेल्या 22 फेब्रुवारी रोजी अशा काही तक्रारी सुरू झाल्या आणि रुग्णांची संख्या वाढू लागल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या. सखोल चौकशी सुरू झाली आणि आजाराचे मूळ शोधण्यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागल्या. याच परिसरातील एका दूध डेअरीमधून विकले जाणारे दूध आहारात वापरले गेल्याने या तक्रारी सुरू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष निघाला आणि या दुधाची तपासणी करण्यात आली.
 

जगणे भेसळयुक्त होत आहे 
 
 
पूर्णान्न आणि आरोग्यरक्षक मानल्या जाणाऱ्या दुधामुळे अनेक जण अक्षरशः मृत्युशय्येवर पडले. 20 हून अधिक लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. लहान मुले, वृद्ध, महिलांनाही या दुधाची बाधा झाली आणि 16 जण अक्षरशः तडफडून मरण पावले. एथिलिन गायकॉल नावाचा अँटी-फ्रिझ म्हणून वापरला जाणारा व मानवी आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक असणारा विषारी पदार्थ दुधात मिसळला जात होता आणि या भेसळयुक्त दुधामुळे 16 जीव प्राणास मुकले, काही जण गंभीर आजाराशी कमालीचा संघर्ष करून कसाबसा तरले. 100 हून अधिक कुटुंबांच्या घरी त्या डेअरीमधून हे दूध वितरित केले जात होते. त्याचा आहारात वापर केलेल्या काहींना डायलिसिस द्यावे लागले, काही जणांची प्रकृती एवढी बिघडली की त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला. त्याआधी गेल्या वर्षी, जूनमध्ये उत्तर प्रदेशातील आग्रा येथे भेसळयुक्त दूध प्यायल्याने दोन निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यावर प्रशासनाने आग्रा बाह्य रस्त्यावरच दुधाची वाहतूक करणारा एक टँकर जप्त केला आणि तब्बल पाच हजार लिटर भेसळयुक्त दूध रस्त्यावर ओतून दिले. असाच एक प्रकार गेल्या वर्षी मे महिन्यात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात उघडकीस आला होता. सोलापूर जिल्ह्यातील एका गावातील शीतकरण केंद्रातून गाईचे दूध घेऊन कोल्हापूरकडे निघालेल्या पाच टँकरमध्ये भेसळयुक्त दूध असल्याची खात्रीशीर माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली आणि वाटेतच टँकर अडवून दुधाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये भेसळ असल्याचे निष्पन्न झाल्यावर पाचही टँकरमधील सुमारे 75 हजार लिटर दूध ओतून नष्ट करण्यात आले. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील भवरखेडे येथे घातक रसायनांपासून बनविलेल्या दुधाची विक्री होत असल्याची खबर मिळाल्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाèयांनी पोलिसांच्या मदतीने कारवाई करून बनावट दूध तयार करणाèया एका तरुणास अटक केली. गेल्या जुलै महिन्यातील या कारवाईत सुमारे 80 लिटर बनावट दूध नष्ट करण्यात आले, पण तोवर असे किती दूध विकले गेले असेल आणि किती जणांनी भेसळयुक्त दूध पूर्णान्न म्हणून आहारात वापरले असेल या भीतीने गाव गोठले असेल यात शंका नाही. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी बनावट दूध तयार करण्याचा उद्योग चालत असल्याचे बोलले जाते. अनेक ठिकाणी खाजगी दूध संकलन केंद्रांतील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतल्यानंतर कारवायाही करण्यात आल्या होत्या.adulterated milk तरीही भेसळीचे आणि बनावट दुधाचे संकट सरल्याची खात्री नागरिकांना नाही.
तेल, चुना, रसायने, शाम्पू, साबण, बोरिक अ‍ॅसिड, युरिया, स्टार्च, हायड्रोजन पॅराक्साईड यासारख्या आरोग्यास अपायकारक असलेल्या पदार्थांचा वापर करून बनावट दूध तयार करण्याचे कारखाने जागोजागी फोफावल्याच्या बातम्या गेल्या अनेक वर्षांपासून सतत कानावर आदळत असतात. आग्रा येथे दोन बालकांचा मृत्यू झाल्यावर पुन्हा एकदा त्या बातम्यांनी डोके वर काढले. यापैकी काही रसायने एवढी घातक असतात की त्यामुळे कर्करोगासारखे आजारही बळावू शकतात, शरीरातील पेशींचे नुकसान होते आणि आनुवंशिकतेच्या गुणात्मकतेलाही बाधा येऊ शकते, असे अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले आहे. मात्र, अजूनही, दूध हे पूर्णान्न असल्याची सार्वत्रिक समजूत श्रद्धेने जोपासली जाते. भेसळयुक्त पदार्थ तयार करणे, ते बाजारपेठेत आणणे आणि ग्राहकाच्या माथी मारणे ही जीवघेणी अनैतिक व्यापारनीती केवळ दुधासारख्या एकाच पदार्थापुरती मर्यादित राहिलेली नाही. आरोग्यास पोषक मानल्या जाणाèया दुधापासून ते आरोग्यास अपायकारक असलेल्या दारूपर्यंत सर्वत्र भेसळीच्या धंद्याचा उच्छाद सुरू असल्याने, कोणत्याही वस्तूच्या नैसर्गिक शुद्धतेवर डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी हमी देणे सामान्य समाजास अशक्य होऊ लागले आहे. दोन-चार दिवसांपूर्वी गुजरातमधील अहमदाबादेत चांदखेडा परिसरात एका कुटुंबाने तयार डोश्याचे पीठ विकत आणले. घरच्या घरी बनविलेला डोसा आरोग्यास चांगला असतो या विश्वासाने तो खाल्ल्यावर सर्वांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि अन्न विषबाधेची सारी लक्षणे दिसू लागली. उपचार सुरू झाले, पण कुटुंबातील दोन बालके मात्र हे विष पचवू शकली नाहीत. उपचार सुरू असतानाच त्यांनी प्राण सोडला. यातील एका बालिकेने जेमतेम काही महिन्यांपूर्वी जगात प्रवेश केला होता. उघड्या डोळ्यांनी जग पाहण्याआधीच तिला जगाचा निरोप घ्यावा लागला. तिच्या आईने डोसा खाल्ल्यानंतर स्तनपान दिल्याने तिचा मृत्यू झाला असावा असे सांगितले जाते. अन्नातील भेसळीचे हे अंगावर शहारे आणणारे जीवघेणे उदाहरण आहे.
दोन-चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये नवरात्रीचा उत्सव साजरा करताना भेसळयुक्त कुट्टू पिठाचे सेवन केल्याने सुमारे दीडशे जणांना विषबाधा झाली, तर हरयाणाच्या सोनीपतमध्ये तीन वर्षांपूर्वी गव्हाचे भेसळयुक्त पीठ खाल्ल्याने एक जण मरण पावला. अलिकडे तांदूळही नकली मिळत असल्याची भीती व्यक्त होत असते आणि अंड्यांच्या शुद्धतेवरही प्रश्नचिन्हे उमटत असतात. नकली मिठाने बाजारात शिरकाव केल्याच्या भीतीने अनेक जण धास्तावले आहेत. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाèया लाल तिखट व हळदीमध्ये रासायनिक रंगाची भेसळ, काळेमिरीमध्ये पपईच्या वाळलेल्या बियांची भेसळ, दुग्धजन्य पदार्थांपासून बनविल्या जाणाèया मिठाईमध्ये मैदा वा अन्य रासायनिक पदार्थांची भेसळ, जीव वाचविण्यासाठी आणि आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी घ्यावयाच्या औषधांमध्येही भेसळ आणि पिकांचे पोषण व्हावे यासाठी वापरल्या जाणाèया खतामध्येही भेसळ आढळू लागल्याने, जगाचे अवघे जगणे भेसळयुक्त होऊ लागले असून, ज्याचे सेवन जगण्यासाठी करावे त्यापैकी काहीही मरणास कारणीभूत ठरू शकते या भीतीचे वास्तविक रूप आता दिसू लागले आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये गुजरातच्या नडियाद नावाच्या गावात पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाला. अचानक झालेल्या या दुर्घटनेचा तपास करताना पोलिसही चक्रावून गेले आणि मृत्यूच्या कारणाचा शोध लागला. मिथाईल अल्कोहोल नावाचा विषारी पदार्थ मिसळलेले भेसळयुक्त आयुर्वेदिक औषध घेतल्याने हे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. कोविड महामारीच्या संकटात जेव्हा प्रत्येक जण जीव वाचविण्यासाठी जिवाचे रान करत होता, तेव्हा काही भेसळखोरांच्या टोळ्या मात्र या आजारापासून बचाव करणारे औषध समजले जाणाèया रेमडेसिविर नावाच्या इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यांमध्ये पाणी घालून विकण्याचा धंदा करत होते. उत्तर प्रदेशातील लखनौमधील रक्तपेढ्यांमध्ये उघडकीस आलेला प्रकार तर भयावह आहे. येथील काही रक्तपेढ्यांमधील रक्त मानवी शरीरासाठी घातक असल्याचे अन्नसुरक्षा प्रशासनाने एका अहवालाद्वारे उघड केले आणि लखनौवासीयांची झोप उडाली. एक मोठी टोळी संघटितपणे उत्तर प्रदेशातील अनेक गावांत भेसळयुक्त रक्ताचा धंदा करत असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. त्यानंतर लखनौमध्ये काही रक्तपेढ्यांवर धाडी घालण्यात आल्या आणि तेथील रक्त भेसळयुक्त असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचे धागेदोरे राजस्थानापर्यंत पोहोचल्याचेही तपासात निष्पन्न झाले होते. काही रक्तपेढ्यांना सलाईनचे पाणी मिसळलेल्या भेसळयुक्त रक्ताच्या पिशव्या स्वस्त किमतीस विकल्या जात होत्या, असेही स्पष्ट झाले. असे भेसळयुक्त रक्त रुग्णाच्या शरीरात गेल्यास संसर्ग पसरून काही तासांतच रुग्ण दगावतो, असे या क्षेत्रातील जाणकारांनी तेव्हा स्पष्ट केले होते. सोडियम क्लोराईड मिसळलेले सलाईनचे पाणी मिसळून रक्त दुप्पट करण्याचा हा मानवी जिवाशी खेळण्याचा अघोरी आणि अमानवी प्रकार म्हणजे, भेसळीच्या विकृत धंद्याचे थेट उदाहरण आहे.
अन्नपदार्थांतील भेसळ हा अनेक दशकांपासून होत असलेला अनैतिक आणि अमानवी व्यवहार आहे. जगभर अनेक देशांत अन्न भेसळीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. रेस्टॉरेंटमधील फ्रायर्स, ग्रीस ट्रॅप्स आणि कत्तलखान्यातील कचèयातून काढलेले किंवा टाकून दिलेल्या प्राण्यांच्या अवयवांपासून काढलेल्या अवैध खाद्यतेलाचा घोटाळा चीनमध्ये गाजला होता. तैवान, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्येही अशी दूषित अन्न उत्पादने आढळली. 2013 मध्ये, इराणमध्ये मिथेनॉलमुळे 694 जणांना विषबाधा झाली आणि आठ जणांचा मृत्यू झाला. 2018 मध्ये, मलेशियामध्ये मिथेनॉल विषबाधेमुळे अनेकांचे अवयव कायमचे निकामी झाले, तर 64 जणांचा मृत्यू झाला. डिसेंबर 2021 ते मे 2022 दरम्यान झालेल्या व्यापक मोहिमेचा भाग म्हणून, 26 देशांच्या अधिकाèयांनी जवळपास 27,000 टन बनावट अन्न आणि 1.5 कोटी लिटर मद्यपेये जप्त केली होती. ऑक्टोबर 2022 मध्ये, पाकिस्तानच्या अन्न सुरक्षा आणि हलाल अन्न प्राधिकरणाने साखर, रसायने आणि मेण यांची भेसळ असलेला 4000 लिटर बनावट मध जप्त केला. डिसेंबर 2022 मध्ये, भारतातील बिहारमध्ये भेसळयुक्त दारू प्यायल्याने 12 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 15 हून अधिक लोकांची दृष्टी गेली. जुलै 2022 मध्ये, भारतातील अधिकाèयांनी 30 टन भेसळयुक्त पदार्थ मिसळलेले जिरे जप्त केले.
आधुनिक काळात अन्न भेसळ संशोधनात लक्षणीय तांत्रिक प्रगती होत आहे. पूर्वी, भेसळयुक्त अन्न उत्पादने काही भौतिक मापदंडांच्या आधारावर ओळखली जात होती. आता जागतिक बाजारपेठांच्या विस्तारामुळे आणि व्यावसायिक स्पर्धेमुळे, अन्न भेसळीचे प्रमाण वेगाने वाढले आहे. निकृष्ट दर्जाचे घटक वापरून कच्च्या मालाचा आणि उत्पादनाचा खर्च कमी करणे, हा अन्न भेसळीमागील मुख्य उद्देश असतो हे स्पष्ट आहे. खाद्यपदार्थांचे भौतिक गुणधर्म आणि चव अनेक प्रकारे बदलली जातात. फळे कृत्रिमरीत्या पिकवणे हा अन्न भेसळीचा एक सामान्य प्रकार आहे. संरक्षक, रंग आणि कृत्रिम गोडवा वापरून केलेली भेसळ ही देखील अन्न भेसळीची सामान्य तंत्रे आहेत.adulterated milk उत्पादनाविषयी खोटी माहिती देणे यालाही भेसळ मानले जाते. कोणत्याही खाद्यपदार्थांची निवड करताना ग्राहक सर्वसाधारणपणे त्यांचा रंग, पोत आणि स्वरूप हे महत्त्वाचे निकष मानतो. आकर्षक रंग असलेल्या खाद्यपदार्थांमुळे त्यांची बाजारपेठेतील मागणी आणि नफा वाढतो. फळे आणि भाज्या ग्राहकाच्या माथी मारण्याच्या धंद्यात, नैसर्गिक रंगाहून अधिक आकर्षक असलेल्या कृत्रिम रंगांचा वापर होतो. ग्राहकांची पसंती वाढवण्यासाठी टरबुजांमध्ये लाल रंग टाकला जातो. हिरवी मिरची, हिरवे वाटाणे, कारले, भेंडी यांसारख्या हिरव्या भाज्यांना अधिक हिरव्या, ताज्या, चमकदार आणि तेजस्वी दिसण्यासाठी मॅलाकाईट ग्रीनचा वापर केला जातो, तर वांगी, टोमॅटो, फुलकोबी आणि पानकोबीमध्ये रंगासाठी मोबाईल ऑईल आणि ताजा जांभळा रंग येण्यासाठी कार्बोफ्युरानची इंजेक्शने दिली जातात. अंडी कृत्रिमरीत्या रंगवली जातात, तर अंड्याच्या पिवळ्या बलकाचा रंग अधिक आकर्षक करण्यासाठी कोंबड्यांनाच रंग मिसळलेले खाद्य दिले जाते, असे अनेक प्रकार काही आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणांतून उघडकीस आले आहेत.
मानवी जीवनाशी खेळ खेळणारा हा धंदा सर्वांच्याच दृष्टीने चिंताजनक ठरला आहे. महाराष्ट्रात आणि देशातही, अन्नपदार्थ व खाद्यपदार्थांतील भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायद्यांची तरतूद आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही भेसळीच्या आव्हानाची गंभीर दखल घेतली. या धोक्यास सामोरे जाण्यासाठी करावयाच्या उपायांचा विचार करण्यासाठी गेल्या 7 एप्रिल रोजी नवी दिल्लीत आयोगाने आयोजित केलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत अन्न भेसळीचा गंभीर धोका अधोरेखित करण्यात आला. केवळ कायदे किंवा कारवाया करून ही दुष्प्रवृत्ती नष्ट होणार नाही, तर जनजागृती आणि खाद्यसुरक्षेविषयीची सावधानता यातूनच भेसळखोरीला आळा घालण्यास मदत होईल, असे मत आयोगाचे सदस्य न्या. डॉ. बिद्युतरंजन सारंगी यांनी व्यक्त केले, तर भेसळीचे प्रकार थांबविण्यासाठी बहुस्तरीय कार्यगट स्थापन करावा अशी सूचना आयोगाच्या सदस्य विजया भारती यांनी केली. भेसळीचे गंभीर परिणाम विशेषत: गर्भवती महिला बालके आणि वयोवृद्धांच्या आरोग्यावर होत असल्याची बाब आयोगाचे महासचिव भरत लाल यांनी अधोरेखित केली आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांची ओळख पटविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त उपकरण विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला. जिथे मानवी बुद्धी कुंठित होते, तेथे कृत्रिम बुद्धिमत्ता कामास येते, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. भेसळयुक्त जगण्यापासून जगाची मुक्तता करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झाला, तर ते एक मोठे वरदान ठरेल.