अवघा महाराष्ट्र सुन्न! एकाच दिवशी 2 जिल्ह्यात अपघात 4 जण जिवंत जळाले

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
मुंबई
road accident राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या रस्ते अपघातांच्या मालिकेत आणखी दोन भीषण दुर्घटनांची भर पडली असून नाशिक आणि गोंदिया जिल्ह्यांत घडलेल्या अपघातांमध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनांमुळे संपूर्ण राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे.
 

road accident 
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात शहा-पांचाळे मार्गावर शिंदेवाडी शिवाराजवळ पहाटे सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. पांगरी गावात धार्मिक कार्यक्रम आटोपून काही नागरिक पिकअप वाहनातून पांचाळेकडे परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहन सुमारे १०० फूट फरफटत गेले.अपघातानंतर पिकअपच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन वाहनाने क्षणार्धात पेट घेतला. आगीचे लोळ इतके भयानक होते की प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या आगीत चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये किरण रवी मोरे (२३), शुभम गणेश नवले (२१), रिंकू शुभम नवले (१९) आणि मीराबाई विश्वनाथ गंगुर्दे (६८) यांचा समावेश आहे.या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने सिन्नर आणि नाशिक येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.
 
 
गोंदिया जिल्ह्यातील घटना
दरम्यान, दुसरी घटना गोंदिया जिल्ह्यातील road accident  अर्जुनी मोरगाव तालुक्यात घडली. नवेगाव बांध परिसरातील पांढरवाणी नाल्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ‘हिट अँड रन’ प्रकारात एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या मोटारसायकलवर एक पुरुष आणि दोन महिला प्रवास करत होते.धडक इतकी जबरदस्त होती की मोटारसायकलस्वार पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर गोंदिया जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून नवेगाव पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. पंचनामा पूर्ण करून पुढील तपास सुरू आहे.एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत घडलेल्या या दुर्घटनांमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि बेफिकीर वाहनचालकांविरोधात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना विशेषतः रात्रीच्या प्रवासात अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.