मुंबई
onion price : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून लाल कांद्यानंतर आता उन्हाळी कांद्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. बाजारात नव्याने दाखल होणाऱ्या कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. त्यामुळे बळीराजाच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठेत सध्या कांद्याला केवळ ८ ते १२ रुपये प्रति किलो इतकाच दर मिळत आहे. उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि साठवण खर्च लक्षात घेता हा दर अत्यंत तोट्याचा असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
कांद्याच्या दरातील घसरणीमागे आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा मोठा प्रभाव असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम भारताच्या कांदा निर्यातीवर झाला आहे. आखाती देशांकडून मागणी कमी झाल्याने व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा पडून आहे. याशिवाय जागतिक स्तरावर कंटेनर वाहतुकीच्या खर्चात मोठी वाढ झाली असून, पूर्वी सुमारे ६०० डॉलरमध्ये उपलब्ध असणारा कंटेनर आता ६,५०० डॉलरपर्यंत महागला आहे. यामुळे निर्यात करणे आर्थिकदृष्ट्या अवघड झाले आहे.
दरम्यान, देशांतर्गत बाजारातही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी प्रतिकूल ठरत आहे. महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात दाखल होत आहे. या राज्यांमधील स्वस्त कांद्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला अपेक्षित मागणी मिळत नाही. परिणामी स्थानिक बाजारपेठांमध्ये दरावर दबाव निर्माण झाला आहे.
यासोबतच नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या खरेदी धोरणातही बदल करण्यात आला आहे. यंदा कांदा खरेदीचे उद्दिष्ट ५ लाख मेट्रिक टनांवरून थेट २ लाख मेट्रिक टनांवर आणण्यात आले आहे. त्यामुळे बाजारातील अतिरिक्त साठा कमी करण्यास मर्यादा येत आहेत.
मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केट येथे शनिवारी कांद्याचे घाऊक दर ८ ते १२ रुपये प्रति किलो दरम्यान नोंदवले गेले. मागील दोन महिन्यांपासून १२ ते १५ रुपयांवर स्थिर असलेले दर आता घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. बाजार निरीक्षकांच्या मते, मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचे दर जवळपास ५० टक्क्यांनी कमी आहेत.विशेष म्हणजे घाऊक बाजारात कांद्याचे दर कमी असतानाही किरकोळ बाजारात ग्राहकांना तो २० ते २४ रुपये प्रति किलो दराने मिळत आहे. यामुळे उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील दरातील मोठी तफावतही अधोरेखित होत आहे.दरम्यान, सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती कायम राहिली आणि निर्यात पूर्ववत झाली नाही, तर येत्या काळात कांद्याच्या दरात आणखी घसरण होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.