ओतूर
Otur rural hospital गेल्या अनेक वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले आणि दुर्लक्षित अवस्थेत पडून असलेले ओतूर येथील ग्रामीण रुग्णालय अखेर सुरू होणार आहे. येत्या १ मे, महाराष्ट्र दिनी, राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या अद्ययावत रुग्णालयाचे लोकार्पण होणार असल्याची माहिती जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दिली. या निर्णयामुळे जुन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत पूर्णत्वास आली असली तरी प्रशासकीय कारणांमुळे उद्घाटन रखडले होते. या प्रश्नावर स्थानिक नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केला होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक संघाने उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. या पार्श्वभूमीवर आमदार सोनवणे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित करून नागरिकांशी संवाद साधला आणि १ मे ही उद्घाटनाची तारीख निश्चित झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
या बैठकीस सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. स्थानिक पातळीवर दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर अखेर तोडगा निघाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आमदार सोनवणे यांनी सांगितले की, हे उद्घाटन केवळ एका इमारतीचे नसून स्थानिक जनतेच्या संयम, सातत्य आणि संघर्षाचा विजय आहे. १ मेपासून परिसरातील रुग्णांना उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज उरणार नाही.
दरम्यान, या रुग्णालयाच्या भविष्यातील विकास आराखड्याचीही माहिती देण्यात आली. सध्या ३० खाटांचे असलेले हे रुग्णालय टप्प्याटप्प्याने १०० खाटांपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी येथे सुसज्ज ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची योजना आहे.
रुग्णालयात सर्पदंश प्रतिबंधक लस, वन्यप्राण्यांच्या चाव्यावरील लसी आणि इतर अत्यावश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय अखंड वीज पुरवठ्यासाठी उच्च क्षमतेच्या जनरेटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. बैठकीला आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रकल्प मार्गी लागल्याने ओतूर आणि परिसरातील नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.