डगआउटमध्ये मोबाईल वापरल्याने राजस्थान रॉयल्स वादात

अँटी-करप्शन नियमांचे उल्लंघन!

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
गुवाहाटी,
rajasthan-royals-in-controversy : इंडियन प्रीमियर लीग 2026 दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाचे टीम मॅनेजर रोमी भिंडर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्यांनी डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.
 
 
rajasthan-royals-in-controversy
 
 
आयपीएलच्या नियमांनुसार, ‘खेळाडू आणि सामना अधिकारी क्षेत्र’ (पीएमओए) मध्ये मोबाईल किंवा कोणत्याही कम्युनिकेशन डिव्हाइसचा वापर पूर्णपणे बंद आहे. मात्र, भिंडर यांनी या नियमाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. विशेष म्हणजे, तेव्हा भिंडर यांच्या शेजारी युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी बसलेला दिसत होता, ज्यामुळे या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.
 
बीसीसीआयनेही या घटनेची दखल घेतली असून, हा नियमभंग झाल्याची कबुली दिली आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असून, अहवालानुसार कारवाई ठरवली जाईल. भिंडर यांच्यावर इशारा, दंड किंवा सामन्यातील बंदी अशा शिक्षांची शक्यता वर्तवली जात आहे.
 
आयपीएलमध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांकडे अत्यंत गंभीरतेने पाहिले जाते. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा लीगमधील नियम आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.