- ‘स्टार्टअप’ कल्पनांतून विद्यार्थ्यांनी दाखवली विकसित भारताची वाट
नागपूर,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इन्क्युबेशन सेंटर, विदर्भ इकॉनोमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद) आणि ‘लेमन आयडियाज’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘Viksit Bharat Startup Conclave’ ‘विकसित भारत स्टार्टअप कॉन्क्लेव्ह’मध्ये देशभरातील विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांनी प्रभावी ठसा उमटवला. गुरुनानक भवन येथे झालेल्या या कॉन्क्लेव्हमधील ‘ज्युनियर इनोप्रिन्युअर्स’ सत्र विशेष आकर्षण ठरले.
६ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्टार्टअप्समधून उद्योजकतेची झलक पाहायला मिळाली. अमृतसरच्या गुरांश सिंह याने ‘गोल्डन इयर्स’ या स्टार्टअपद्वारे विदेशात गेलेल्या मुलांमुळे एकटे पडलेल्या वृद्धांच्या समस्यांवर उपाय सुचवत प्रथम क्रमांक पटकावला. अमरावतीच्या अवनिष बावस्कर याने ‘फ्युएल टँक सेफ्टी डिव्हाईस’ सादर करत वाहनांतील आगीच्या घटनांवर प्रभावी उपाय मांडला.
याशिवाय मुंबई, पुणे, ग्रेटर नोएडा आणि नागपूर येथील विद्यार्थ्यांनीही ‘डीजीरक्षक’, ‘इन्ग्रेडियंट एआय’, ‘नोट्स जीपीटी’, ‘रिफायन टेक्नॉलॉजीस’ आणि ‘स्मार्ट साईट’ यांसारख्या स्टार्टअप्सचे सादरीकरण केले. या कल्पनांमधून तंत्रज्ञान, सामाजिक भान आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांचा सुंदर संगम दिसून आला.
‘Viksit Bharat Startup Conclave’ या प्रसंगी वेदचे संस्थापक विलास काळे यांनी मार्गदर्शन करत नवउद्योजकतेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. ‘स्टार्टअप एक्स्पो’मध्ये २० स्टार्टअप्सचे प्रदर्शन भरविण्यात आले होते, ज्याने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले. विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कारही करण्यात आला. देशासह सहा देशांतील स्टार्टअप्सच्या सहभागामुळे या कॉन्क्लेव्हला आंतरराष्ट्रीय स्वरूप लाभले. विद्यार्थ्यांच्या या नाविन्यपूर्ण प्रयत्नांमधून ‘विकसित भारत’ घडविण्याची ठोस दिशा स्पष्ट होत असल्याचे चित्र या कार्यक्रमातून समोर आले.